७० तासांच्या थरारानंतर यश, १२ दिवसांची पोलिस कोठडी
पुणे : प्रतिनिधी
स्वारगेट बसस्थानक परिसरात शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे २६ वर्षांच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर मुसक्या आवळल्या. सीसीटीव्ही फुटेज, श्वान पथक आणि ड्रोनच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. त्यासाठी पोलिसांचा ताफा थेट गुनाट गावात पोहोचला आणि तब्बल ७० तासांच्या शोधमोहिमेनंतर ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केली. यानंतर आज पुणे सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात मंगळवारी पहाटे उभ्या असलेल्या एका बसमध्ये नराधम दत्ता गाडेने २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. त्यानंतर तो पसार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी ८ पथके तैनात केली. त्यावेळी तो शिरुर तालुक्यातील त्याचे मूळ गाव गुनाट येथे लपला असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी शोध पथके गावात दाखल झाली. तो उसात लपल्याची माहिती मिळाल्याने उसाच्या फडाला पोलिसांनी वेढा घातला आणि ड्रोन आणि श्वान स्क्वॉडच्या मदतीने त्याचा शोध सुरू केला. गुरुवारी अंधार पडण्याच्या अगोदर गाडेचा शोध घ्यायचा होता. परंतु तो सापडला नाही. अखेर मध्यरात्रीनंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले.
आरोपीचा शोध सुरू असतानाच गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास पोलिसांना गावालगतच्या शेतात संशयास्पद हालचाली आढळून आल्या. त्यावरून त्याच घराच्या परिसरात पोलिसांनी शोध सुरू केला. त्यावेळी दत्ता गाडे घराच्या परिसरातील चारीत झोपून राहिला. ग्रामस्थांना तो आढळून येताच त्यांनी हा दत्ता गाडे असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावेळी पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला आज पुणे सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी आरोपीच्या वकिलाने परस्पर सहमतीने हा प्रकार घडल्याचा दावा केला. दरम्यान, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांनी आरोपीला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
आत्महत्येचा प्रयत्न
पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकातील बलात्काराच्या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे घटनेनंतर फरार झाला होता. त्याचा पोलिस शोध घेत होते. त्यासाठी थेट त्याच्या गुनाट गावात पोलिसांचा ताफा दाखल झाला होता. त्याचा शोध सुरू असतानाच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले. आरोपीच्या प्राथमिक वैद्यकीय तपासणीत त्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण आढळून आले. त्याने तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली.
गुनाट ग्रामस्थांचे आभार मानणार
पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत नराधमाच्या अटकेची माहिती दिली. ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवली जाणार आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. सर्व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे, असे सांगतानाच गुनाट ग्रामस्थांनी आरोपीला पकडून देण्यात खूप सहकार्य केले. त्यामुळे गावात जाऊन गावक-यांचे आभार मानू, असेही त्यांनी सांगितले.