नांदेड : शहरात खुनाची मालिका सुरूच असून २६ फेब्रुवारी रोजी एका तरुणाची भल्यासकाळी तीक्ष्ण हत्याराने भोसकून निर्घृण हत्या केल्याची घटना नांदेड शहरातील गणेशनगर वाय पॉईंट परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.
अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील खोब्रागडेनगर-२ येथील रहिवासी अमोल भुजबळे उर्फ एमजे(४२) हा दुचाकीवरून (एम.एच.२६, बी.आर.१३८३) बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास गणेशनगर मार्गावरून जात होता. सदर दुचाकी गणेशनगर वाय पॉईंट जवळ आली असता अमोल हा एका दुकानासमोर थांबला. त्याचवेळी पाठीमागून धावत आलेल्या दोघांनी त्याच्या पाठीवर व इतर ठिकाणी तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याने अमोल भुजबळे हा रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळून गतप्राण झाला. खुनाची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी तातडीने हालचाल करीत दोन मारेक-यांना अवघ्या काही तासांत गजाआड केले आहे. मारेक-यांमध्ये २ भावांचा समावेश असून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने गोपाळ वाकोडे आणि निखील वाकोडे रा. ढोकी ता. जि. नांदेड या दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान आपसातील जुन्या वादामुळे प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे.