नांदेड : प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ गुरूवारी वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या नांदेड बंदला उर्त्फूत प्रतिसाद मिळाला. बंद दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला. मोर्चात हजारो सामान्य नागरिकांसह विद्यार्थ्याची संख्या लक्षणीय होती
या बंदला काँगेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, उबाठा, मनसे यासह समविचारी पक्षांनी पाठिंबा दिला. दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने नांदेड आगाराने सायंकाळपर्यंत एसटी बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
नांदेड बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी आयटीआय चौक येथे वंचित बहुजन आघाडी, समविचारी पक्ष आणि विविध संघटनांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आयटीआय चौकातून शिवाजीनगर, कला मंदिर मार्गे भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो विद्यार्थी, युवक, सामान्य नागरिक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान केंद्र सरकार आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध शैक्षणिक मागण्यांसाठी विद्यार्थी शांततापूर्ण आंदोलन करीत असताना त्यांच्यावर पोलिसांनी लाठीमार केला. या कारवाईत अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या अंतर्गत नांदेडमध्येही बंद पाळण्यात आला. विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवित दोषींवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
दरम्यान पोलिसांच्या सूचनेनुसार नांदेड सर्व एसटी सेवा सायंकाळपर्यंत बंद ठेवण्यात आली. यात नांदेड आगारातून सर्व बस स्थगित करण्यात आल्या.
















