८१ नगरसेवक निवडून द्यावे लागणार
नांदेड : प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने राज्य शासनाने आज नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर केली असून, त्यानुसार नांदेड महापालिकेत एकूण २० प्रभाग असणार आहेत. यामध्ये १९ प्रभागांतील सदस्य संख्या प्रत्येकी ४ तर एका प्रभागात ५ सदस्यसंख्या असेल. या माध्यमातून महानगर पालिकेत ८१ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. दरम्यान, यासंदर्भात काही हरकती असल्यास त्या १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत आयुक्त नांदेड-वाघाळा महापालिका यांच्याकडे नोंदवता येणार आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्याने प्रभाग रचना जाहीर केली आहे. राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये नव्याने प्रभाग रचनेला आव्हान देण्यात आले होते. परंतु हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावत नव्याने होत असलेल्या प्रभाग रचनेचा मार्ग सुकर केला आहे. राज्यातील महायुती सरकारने राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये नव्याने प्रभाग रचना केली असून, त्यानुसार राज्यातील महापालिकांची प्रभाग रचना जाहीर करण्यात येत आहे. त्यात नांदेड-वाघाळा महापालिकेच्या प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. त्यानुसार नांदेड महापालिकेत एकूण २० प्रभाग जाहीर करण्यात आले असून, २० पैकी १९ प्रभागांत प्रत्येकी ४ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत तर एका प्रभागामध्ये एकूण ५ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत.
या प्रभाग रचनेबाबत हरकतीही नोंदविता येणार असून, १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत नांदेड-वाघाळा महापालिकेच्या आयुक्तांकडे लेखी स्वरुपात तक्रारी किंवा हरकती नोंदवाव्यात, असे राज्य शासनाच्या अधिसूचनेद्वारे स्पष्ट करण्यात आले असून, त्यानंतर येणा-या हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नसल्याचे म्हटले आहे.