अहमदपूर : प्रतिनिधी
दिवसेंदिवस कौटुंबिक तसेच सार्वजनिक नात्यांमध्ये विसंवाद वाढत चालले असून भारतीय संस्कृतीचा कणा असलेली कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली आहे. पूर्वी एकत्र कुटुंबात आपापसातील प्रश्न सुटायचे पण आज चौकोनी कुटुंबातही आंतरिक जिव्हाळा राहिलेला नाही. शेजा-याशी स्पर्धा करत सतत पैसा, प्रतिष्ठा आणि पदाच्या मागे धावताना स्वत: समाधानी जगणं माणूस हा विसरत चालल्याची खंत व्यक्त करून सुखाचं पासबुक प्रत्येकांनी जपावं जेणेकरून एकमेकांच्या सुखदु:खात मोकळेपणाने सहभागी होता येईल. लिंबू मिरचीच्या लोणच्याप्रमाणे संसार एकमेकांच्या साथीने सुखाने करावा असे आवाहन करून माणूस वगळता इतर प्राणी आजही प्रेमानेच वर्तन करत असल्याचे मत यावेळी त्यांनी प्रतिपादन केले.
मोहनराव पाटील स्मृती व्याख्यानमालेच्या १८ व्या वर्षातील तिस-या पुष्पाच्या प्रसंगी ‘नाती जपताना’ या विषयावर छत्रपती संभाजीनगर येथील उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर बोलत होत्या. मागील सतरा वर्षापासून ही व्याख्यानमाला स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने चालवली जात असून या परिसरातील ही समृध्द व्याख्यानमाला आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मोहनराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते अंजली धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर संस्थेचे ज्येष्ठ संचालक साहेबराव जाधव, बळीराम भिंगोले गुरुजी, अंकुशराव कानवटे, स्वारातीम विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, शिरूरचे सरपंच मच्छिंद्र वाघमारे, प्राचार्य डॉ. डी. जी. माने आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय व्याख्यानमाला संयोजन समितीचे समन्वयक प्रा. डॉ. नारायण कांबळे यांनी करून दिला तर सूत्रसंचालन आणि आभार प्रा. डॉ. गोविंद काळे यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थितांमध्ये माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, शिवानंद हेंगणे, निवृत्तीराव कांबळे, डॉ. अशोकराव सांगवीकर, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. भगवानराव पौळ, मोहिब कादरी, महेंद्र खंडागळे, प्राचार्य आर. एन. वलसे गुरुजी, प्राचार्य डॉ. दत्ता पाटील, राम तत्तापुरे, अंकुशराव ढोकाडे, ज्ञानोबा भोसले, सुभाष हंगरगे, डॉ. उदयभास्कर भोसले, चंद्रकांत गायकवाड गुरुजी आदी मान्यवर तसेच महिला आणि विद्यार्थी श्रोते मोठ्यासंख्येने उपस्थित होते. सदरील व्याख्यान यशस्वीतेसाठी संयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.