28.7 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रनाला रुंदीकरणावरून सत्ताधा-यांमध्येच जुंपली

नाला रुंदीकरणावरून सत्ताधा-यांमध्येच जुंपली

मुनगंटीवार-राठोड आमने-सामने

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (२ जुलै) तिसरा दिवस आहे. सभागृहात स्थगन प्रस्तावावर चर्चा पार पडली. त्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासावेळी माजी मंत्री तथा भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारसंघातील नाला रुंदीकरणाच्या मुद्यावरून सरकारला प्रश्न विचारले. यावर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिलेल्या उत्तरावर मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे नाराजी व्यक्त केली. यावर अध्यक्षांनी देखील मंत्री राठोड यांना अपेक्षित उत्तर देण्यास सांगितले.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नाल्यांच्या योग्य नियोजनाअभावी नाल्यांशेजारी राहणा-या वस्त्यांना फटका बसतो. नाल्यांची संरक्षक भिंत नियमांनुसार बांधली नाही, पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला तर त्या अभियंत्यांवर कारवाई करणार का? तसेच जिथे जिथे असे नाले असतील त्यांच्या दुरुस्तीबद्दल सरकारचे नियोजन काय? यावर उत्तर देताना मंत्री संजय राठोड म्हणाले, आम्ही अशा नाल्यांचे सर्वेक्षण करू. नाल्यांची रुंदी तपासू, ती वाढवावी लागेल का ते पाहू. भूमिअभिलेख विभागाकरवी जिल्ह्याधिका-यांच्या देखरेखीखाली चौकशी करू. उर्वरित नाल्यांचे बांधकाम करण्यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवू.

मंत्री राठोड यांचे उत्तर ऐकून मुनगंटीवार म्हणाले, ‘‘नाल्याची जितकी नैसर्गिक रुंदी आहे तितकीच राहिली पाहिजे याची खबरदारी शासन घेणार आहे का?’ यावर मंत्री राठोड यांनी केवळ ‘सजेशन फॉर ऍक्शन’ एवढंच उत्तर दिलं. यावर मुनगंटीवारांनी नाराजी व्यक्त केली.

दादा कोंडकेंसारखे उत्तर
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नाल्याची नैसर्गिक रुंदी कायम राहील का असा माझा प्रश्न होता. त्यावर त्यांनी ‘सजेशन फॉर ऍक्शन’ एवढेच उत्तर दिले आहे. ऍक्शन, ओन्ली ऍक्शन, नो रिऍक्शन असे असले पाहिजे. मंत्र्यांकडून अपेक्षित आहे की नाल्याची नैसर्गिक रुंदी काय राहिली पाहिजे. ‘सजेशन फॉर ऍक्शन’ हे काय उत्तर आहे? हे तर द्विअर्थी दादा कोंडकेंचे उत्तर आहे. त्याऐवजी नाल्याची रुंदी निश्चित राहील याची हमी द्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR