नाशिक : प्रतिनिधी
डेअरी फार्मवर गायींचे पालन करण्यात येत आहे. या गायींसाठी बाजारातून किंवा शेतक-यांकडून कडब्याचा चारा आणला जात असतो. दरम्यान बाजारातून आणलेला चारा गायींना खाऊ घातल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. यात तब्बल ४६ गायींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या आडगाव गावालगत असलेल्या रौंदळ डेअरी येथे घडली आहे. यामुळे डेअरी फार्म चालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नाशिकच्या आडगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. रौंदळ डेअरी फार्म येथे ५० ते ६० गायी आहेत. या गायींसाठी रोज मोठ्या प्रमाणात चारा लागत असतो. याकरिता डेअरी चालक आजूबाजूच्या परिसरातील शेतक-यांकडून कडब्याचा चारा तसेच बाजारातून पशुखाद्य विकत आणत असतो. त्यानुसार बाजारातून आणलेला चारा आपल्या गोठ्यातील जनावरांना खाऊ घातला.
चारा खाल्ल्यानंतर काही वेळातच गायींमध्ये अस्वस्थता दिसून आली. यानंतर एकामागोमाग एक गायी जमिनीवर कोसळू लागल्या. यानंतर पशुवैद्यक अधिका-यांना तपासणीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र या घटनेत आतापर्यंत ४६ गायी मृत्युमुखी पडल्या असून इतर काही गायी अस्वस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरूच आहेत. दरम्यान पशुवैद्यकीय अधिका-यांनी प्राथमिक तपासणीमध्ये चा-यात विषारी पदार्थ आढळल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
चाराविक्रेत्यावर गुन्हा दाखल
दरम्यान चारा खाल्ल्याने गायींचा मृत्यू झाल्याने पशुवैद्यकीय अधिका-यांनी चा-याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. रिपोर्ट आल्यानंतर नेमकं कारण स्पष्ट होईल. दरम्यान याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात चारा विकणा-या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र या प्रकारात डेअरी चालकाचे मोठे नुकसान झाले आहे.