२० नोव्हेंबरला होऊ शकतो शपथविधी
पाटणा : वृत्तसंस्था
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप्रणित एनडीए आघाडीने एकतर्फी विजय मिळवला. आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत उत्सुकता आहे. ते अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र येत्या ३-४ दिवसांत बिहार सरकारचा शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता असून, या सोहळ््याला देशभरातील पाहुणे उपस्थित राहू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १९ किंवा २० नोव्हेंबरला बिहार सरकारचा शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, नितीश कुमार पुन्हा एनडीएचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असण्याची शक्यता असून, ते दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात.
या सोहळ््याची तयारी सुरू झाली आहे. प्रशासनाने १७ ते २० नोव्हेंबरपर्यंत पाटण्यातील गांधी मैदान जनतेसाठी बंद ठेवण्याचा आदेश जारी केला. त्यामुळे या मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मैदानाभोवती पोलिस तैनात करण्यात आले आहेत. उद्यापासून ही सुरक्षा व्यवस्था आणखी वाढण्याची शक्यता आहे. नितीश कुमार हे सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत.
आज मंत्रिमंडळ बैठक
नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळाची अखेरची बैठक सोमवारी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. या बैठकीत राजीनाम्याचे प्रस्ताव मंजूर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर नितीश कुमार राज्यपालांना भेटून राजीनामा देण्याची शक्यता आहे.
मंत्रिपद वाटपावर मतैक्य?
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकल्या आहेत तर जेडीयूने ८५ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे आता भाजपला जास्त मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सहा आमदारांमागे एक मंत्रिपद वाटले जाण्याची शक्यता आहे. यावर घटक पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे.

