अन्यत्र मैत्रीपूर्ण लढत होईल, महायुतीचीच सत्ता येणार : मुख्यमंत्री
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज छत्रपती संभाजीनगर दौरा होता. यावेळी त्यांनी विभागीय कार्यालयाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची शक्य तिथे युती होणार आहे आणि जिथे युती होणार नाही, तिथे महायुतीत युती होईल आणि राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. या वक्तव्यामुळे महायुतीतील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. यावरून सरसकट युतीची शक्यता मावळली आहे.
बिहारच्या जनतेने मोदींवर विश्वास दाखवत नितेश कुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विरोधकांचा सुपडा साफ केला. याबद्दल बिहार जनतेचे आभार मानतो. आपला विजयाचा रथ सातत्याने पुढे जात आहे. येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही विरोधकांची पुन्हा हीच परिस्थिती होणार आहे, असा इशारा फडणवीसांनी विरोधकांना दिला. मराठवाड्यात सरकारने अनेक चांगली कामे केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील पिण्याच्या पाण्याची योजना आपण मंजूर केली. आपण मंजूर केलेल्या योजनेचा ८०० कोटीचा कर राज्य सरकार भरणार, असा निर्णय केला. पण आंदोलन करणा-यांचे सरकार आल्यानंतर ८०० कोटी रुपये महापालिकेने भरावे, असा निर्णय केला.
यामुळे काम थांबले. आता आपले सरकार आल्यानंतर पैसे दिले आहेत. यामुळे प्रत्येक घरात रोज पाणी मिळणार आहे. आंदोलन करणा-यांसारखे खोटारडे लोक नाहीत. यांना महापालिका निवडणुकीत जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आले आहेत. यातून मोठा रोजगार मिळाला. देशाचा इलेक्ट्रिक वाहन कॅपिटल छत्रपती संभाजीनगर होत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य सरकार शेतक-यांच्या पाठिशी
समृद्धी महामार्गामुळे शहराला फायदा झाला, मराठवाड्यातील सिंचन, नदीजोड प्रकल्प सरकारने केले आहेत. शेतक-यांवर संकट आल्यावर राज्य सरकार शेतक-याच्या पाठीशी उभे राहिले आहे. उद्धव ठाकरे मराठवाड्यात आले तेव्हा अंबादास दानवे माणसे शोधत होते. लोकांना माहिती आहे यांच्याकडे काही नाही, अशी टीकाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
















