26.6 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रनिर्भय बनोवरून पुण्यात राडा

निर्भय बनोवरून पुण्यात राडा

भाजप कार्यकर्ते आक्रमक, वागळेंची गाडी फोडली, दगडफेकीत अनेकजण जखमी

पुणे : प्रतिनिधी
पुण्यात निर्भय बनो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे, समाजसेवक विश्वंभर चौधरी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. परंतु हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच कार्यक्रमाला गालबोट लागले. यावेळी पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पोलिस बंदोबस्तात जात असताना प्राणघातक हल्ला केला. भाजपकडून कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिल्यानंतर निखिल वागळे यांना निर्भय बनो कार्यक्रमासाठी पोहोचण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्यात आला. मात्र, कार्यक्रमस्थळी पोहोचेपर्यंत वागळेंची गाडी चारवेळा गाडी फोडण्यात आली. इतकेच नव्हे तर दगडफेक, शाईफेक, अंडीफेक करण्यात आली. या हल्ल्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले.

निर्भय बनो या सभेचे पुण्यातील साने गुरुजी हॉलमध्ये आयोजन करण्यात आले. निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांना पुण्यात येण्यास विरोध केला. त्यावरून आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांची गाडी फोडली, गाडीवर शाईफेक केली, काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आडवे पडून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. दगडफेकीत अनेक कार्यकर्ते जखमी झाले. मात्र, न डगमगता निर्भय बनोचा कार्यक्रम घेतला. यावेळी निखिल वागळे यांनी सरकारवर तोफ डागली.

जखमी महिलांचा
भाजपवर हल्लाबोल
पीडित जखमी महिलांनी भाजपावर हल्लाबोल केला. भाजपा कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा दावा या महिलांकडून करण्यात आला. प्रभात रोडपासून आमच्यावर हल्ले करण्यात आले. आम्हाला पोलिस संरक्षण नव्हते. भाजपाच्या लोकांनी आमच्यावर दगडफेक केली. अंडी फेकली. महिलांची ओढाताण केली. भलामोठा दगड आमच्यावर बसला, असा आरोप यावेळी करण्यात आला.

दोषींवर कारवाई केली जाईल
पत्रकार निखिल वागळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर पुण्यात असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी तेथील पोलिस आयुक्तांशी लगेच बोलणार असून कडक कारवाई करायला सांगणार आहे. जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणीही कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याचा प्रयत्न करू नये, असे म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR