निलंगा : लक्ष्मण पाटील
निलंगा शहरासह तालुक्यात खासगी वॉटर प्लांटचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असताना, या प्लांटमधून पुरविण्यात येणारे पाणी शुद्ध आणि पिण्यायोग्य आहे की नाही, याची नियमित तपासणी होत नसल्याचे चित्र समोर येत आहे. विशेष म्हणजे, या व्यवसायावर नियंत्रण कोणाचे, याबाबत नगरपालिका आणि अन्नसुरक्षा विभागाकडून परस्परांकडे बोट दाखवले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
निलंगा शहरात सुमारे २५ खासगी वॉटर प्लांटमधून जारद्वारे पाण्याची विक्री केली जाते. ग्रामीण भागातील अनेक गावांतही असे प्लांट सुरू आहेत. मात्र, संबंधित प्लांटचालकांनी आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का, तसेच त्यांच्या पाण्याची गुणवत्ता तपासली जाते का, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे नियमांचे पालन होते की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे यांच्याकडे विचारणा केली असता, खासगी वॉटर प्लांटवर नगरपालिकेचे थेट नियंत्रण नसून, त्यांच्या पाण्याची तपासणीही पालिकेकडून केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. तर अन्नसुरक्षा विभागाचे काकडे यांनी हा विषय आपल्या विभागाच्या अखत्यारीत नसल्याचे सांगत संबंधितांना नगरपालिकेची परवानगी घ्यावी लागत असल्याचे स्पष्ट केले. प्रशासनातील या परस्परविरोधी भूमिकेमुळे वॉटर प्लांटच्या नियंत्रणाची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
















