19.9 C
Latur
Friday, January 30, 2026
Homeमहाराष्ट्रनिवडणूक आयोगाचा घोळात घोळ

निवडणूक आयोगाचा घोळात घोळ

जि. प., पं. स. निवडणुका पुढे ढकलल्या, टीईटी परीक्षेने शिक्षकांत गोंधळ
५ ऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान, ९ ला मतमोजणी

मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर केल्याने १२ जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांची निवडणूक २ दिवस पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता ५ फेब्रुवारीऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे निवडणूक आयोगाचा घोळ चव्हाट्यावर आला आहे. कारण मतदान प्रक्रियेची धुरा शिक्षकांवर असताना त्याच दिवशी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) ठेवल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून, आता थेट शिक्षकांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांचा निवडणुकांसाठी १३ जानेवारी रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणा-या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, २८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने राज्य शासनाने ३ दिवसांचा दुखवटा जाहीर केला. याचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका २ दिवस पुढे ढकलत ५ फेब्रुवारीऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारीऐवजी ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल, असे जाहीर केले. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमात सहभागी झालेल्या शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कारण मतदानाच्या दिवशीच शिक्षकांचे भवितव्य ठरविणारी सीटीईटी परीक्षा ठेवली आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांना या परीक्षेला मुकावे लागणार आहे. आता यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, शिक्षकांना दिलासा मिळणार की, मतदानाच्या कर्तव्यापोटी परीक्षेला मुकावे लागणार, हे पाहावे लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR