परब, नांदगावकर, पेडणेकरांना बाळासाहेब आठवले
मुंबई : प्रतिनिधी
राजधानी मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी आणि शिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत भावूक आणि अभिमान वाटावा, असा आजचा क्षण होता. मुंबईतील वरळी डोम येथे मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंचा विजयी जल्लोष सोहळा ग्रँड झाला. यावेळी अनेकांना दिवंगत बाळासाहेबांची आठवण झाली तर मनसेच्या स्थापनेअगोदर शिवसैनिक असलेल्या मनसेच्या नेत्यांनीदेखील आजच्या क्षणावर भावुक होत प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरेंचे खास आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर, शिवसेना आमदार अनिल परब, सुधीर साळवी आणि किशोरी पेडणेकर यांचे डोळे पाणावले होते. आजचा हा क्षण ऐतिहासिक आणि सुवर्णक्षण आहे. मराठी माणसाठी भावूक क्षण आहे, हा भावूक क्षण आणि सण आहे. मराठी माणसाची एकजूट यापुढे कायम राहिल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि आमदार अनिल परब यांनी दिली. यावेळी ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
ज्या महाराष्ट्रात माझा जन्म, त्या मराठी भाषेचा सन्मान माझ्यासाठी प्राथमिक राहील. मी लहानपणापासून शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. ज्यांना बाळासाहेबांनी एकत्र केले, ज्या पठडीत आम्हाला तयार केले, त्यांच्यासाठी हा क्षण महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया परब यांनी दिली. विशेष म्हणजे मुंबईतील या सोहळ््यात ठाकरे बंधूंना एकत्र पाहून अनिल परब यांच्यासह मनसेचे बाळा नांदगावकर, शिवसेनेचे सुधीर साळवी यांनाही अश्रू अनावर झाले होते. बाळासाहेबांची आठवण काढत अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.
हा एकदम आनंदाचा क्षण आहे, या आनंदाच्या क्षणात आम्ही ताकदीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसोबत आहोत. आमच्या वागण्या बोलण्यातच हा आनंद दिसून येत आहे, शिवसैनिक व मनसैनिकांसाठी हा अतिउच्च क्षण आहे. पाण्यावर काठी मारली तरी पाणी वेगळे होत नाही, जे रक्त राज साहेबांच्या धमन्यांमध्ये वाहते, तेच उद्धव ठाकरेंच्या धमन्यांमध्ये वाहते, असेही ते म्हणाले.
बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर उपरोधिकपणे भाष्य केले. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद मला मिळत असल्याचा दावा करत राज ठाकरे यांनी दोन बंधूंना एकत्र आणण्याचे श्रेय दिल्याबद्दल आभार मानतो, असे ते म्हणाले आणि त्यांनी विजयी मेळाव्याच्या अपेक्षेऐवजी तिथे फक्त ‘रुदाली’च झाल्याचा टोमणा मारला. हा मराठीचा उत्सव नव्हता तर ही रुदाली होती, असे ते म्हणाले.
तोंडाच्या वाफा सोडून
काहीच होत नाही
आम्ही तीन वर्षांपूर्वी उठाव केला. त्यावेळी फक्त दाढीवरुन अर्धाच हात फिरवला होता. ते आडवे झाले. आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे उठेगा नहीं वगैरे बोलायचे त्यांना शोभत नाही. त्यासाठी मनगटात जोर लागतो. फक्त तोंडाच्या वाफा सोडून होत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना सुनावले.
सिरसाटांचा ठाकरेंवर निशाणा
उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना राज ठाकरे यांचा चेहरा बघा, त्यांच्याकडून टाळी नाही. ते शांत, गंभीरपणे सर्व ऐकत होते. त्यांनी बहुदा मराठीशिवाय कोणत्या मुद्यावर बोलणार नाही, असे ठरविले असावे. याला बाणा म्हणतात, असे सांगत मंत्री संजय सिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.