लातूर : प्रतिनिधी
प्रसूतीदरम्यान मिळणा-या चांगल्या आरोग्य सुविधांमुळे शहरातील लेबर कॉलनी परिसरातील माता रमाई आंबेडकर स्त्री रुग्णालयाने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. केवळ महिलांसाठी असलेल्या या रुग्णालयात गत वर्षी म्हणजेच जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ या एका वर्षाच्या कालावधीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रसूती नॉर्मल पद्धतीने करण्यात आल्या आहेत. या रुग्णालयाने सुरक्षित मातृत्वावर कार्यातून शिक्कामोर्तब केला आहे. हे रुग्णालय नॉर्मल प्रसूतीच्या गुणवत्तेत अव्वल ठरले आहे.
जेव्हा जेव्हा महिलांच्या प्रसूतीचा विषय येतो तेव्हा तेव्हा नॉर्मल की सिझेरियन, अशी चर्चा होते. आवश्यकच असेल तर सिझेरियनही करणे योग्यच. परंतू, याविषयाचे बाजारीकरण जास्त झाल्याने डॉक्टरांच्याच हेतूवर शंका घेतली जाते. परंतू, लातूर शहरातील लेबर कॉलनी परिसरातील माता रमाई आंबेडकर स्त्री रुग्णालय याला उपवाद ठरले आहे. नॉर्मल प्रसुतीमध्ये मातेला त्रास होतो, हे कारण पुढे करीत सिझेरीयन चांगला पर्याय आहे, असे सांगीतले जाते. त्यामूळे सिझेरियन करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. पण हा सर्व समज चुकीचा ठरवलाय तो माता रमाई आंबेडकर स्त्री रुग्णालयाने. आरोग्य विभागाचे १०० खाटांचे माता रमाई आंबेडकर स्त्री रुग्णालयात दररोज १० ते २० गरोदार मातांची प्रसूती होते. या रुग्णालयात केवळ गुंतागुंतीची किंवा त्या वेळेत आवश्यक असे तरच सिझेरियनचा पर्याय अवलंबला जातो. यासाठी रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ, परिचारिकांसह आरोग्य कर्मचारी हे आपापली जबाबदारी चोखपणे बजावत आहेत. या रुग्णालयात जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ या एका वर्षाच्या कालावधीत एकुण ३ हजार ५०१ प्रसूती करण्यात आल्या.
त्यापैकी तब्बल २ हजार ३२५ प्रसूती नॉर्मल करण्यात आल्या तर १ हजार १७६ प्रसुती आवश्यकतेनूसार सिझेरियन झाल्या. या रुग्णालयात सोनोग्राफी तपासण्यांसह इतर उपचार सुविधा मोफत उपलब्ध ओहत. माता रमाई आंबेडकर स्त्री रुग्णालयात नॉर्मल प्रसुती करण्यावर भर दिला जातो. प्रसूतीसंदर्भात गुंतागुंत असेल तेव्हा सिझेरियनचा पर्याय वापरला जातो. या ठिकाणी सर्व सुविधा मोफत उपलब्ध असल्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविंद्र भालेराव यांनी केले आहे.