चंद्रपूर : प्रतिनिधी
जिल्हा न्यायालय, चंद्रपूर येथे आस्थापनेवरील सफाईगार या निम्नश्रेणी पदाच्या अवघ्या चार जागांसाठी तब्बल ८५० वर अर्ज आले आहेत. यात एम.एस्सी., डी.एड., बी.एड. अशा उच्चशिक्षित उमेदवारांनी देखील अर्ज केले आहेत. परिणामी शिक्षणाच्या शिखरावर पोहोचलेले हात आता झाडूकामासाठी पुढे येत असल्याचे वास्तव या भरतीतून पुढे आले आहे.
सद्यस्थितीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, त्यातुलनेत जागाच निघत नसल्याने बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले तरुण चपराशी, सफाईगार, शिपाई पदासाठी अर्ज करत आहेत. नुकतीच चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या सफाईगार पदाच्या चार जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली.
यात तब्बल ८५० वर अर्ज आले. सफाईगार या पदाची शैक्षणिक पात्रता केवळ सातवी आहे. तरीही पदवीधर, पदव्युत्तर, शिक्षक प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी देखील अर्ज केले आहेत. यावरून बेरोजगारीने घेतलेले गंभीर रूप समोर आले आहे. सफाईगार पदाची शैक्षणिक पात्रता ही सातवी होती. यावरही उच्च शिक्षण घेतलेल्यांनी अर्ज केले.