अखेरच्या सामन्यातही पराभव, ४-१ ने मालिका जिंकली
तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था
इशान किशन याने केलेले शतक आणि त्यानंतर अर्शदीप सिंहने घेतलेल्या ५ विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडचा पाचव्या आणि अंतिम टी-२० सामन्यात ४६ धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर २७२ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, न्यूझीलंडला १९.४ षटकांत २२५ धावाच करता आल्या. भारताने अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करीत शानदार विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने ४-१ अशा एकतर्फी फरकाने मालिका जिंकली.
सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. त्यानंतर इशान किशनने जोरदार फटकेबाजी करीत शतक ठोकले तर कर्णधार सूर्याने अर्धशतकी खेळी केली. अखेरच्या क्षणी हार्दिक पंड्याने फटकेबाजी करत निर्णायक धावा जोडल्या. शिवम दुबे ७ आणि रिंकू सिंह ८ धावांवर नाबाद परतले. संजू सॅमसन पुन्हा अपयशी ठरला. अवघ्या ६ धावा करून माघारी परतला तर सलामीवीर अभिषेक शर्माने ३० धावांचे योगदान दिले.
त्यानंतर विक्रमी धावांचा पाठलाग करायला आलेल्या न्यूझीलंडला पहिल्याच ओव्हरमध्ये अर्शदीप सिंहने टीम सेफर्टला ५ रन्सवर आऊट केले. त्यानंतर फिन एलन आणि रचीन रवींद्रने १०० रन्सची पार्टनरशीप केली. त्यावेळी उपकर्णधार अक्षर पटेलने फिनला आऊट केले. त्यानंतर न्यूझीलंडला ठराविक अंतराने आणि झटपट झटके दिले. त्यामुळे १९.४ षटकांतच सर्व गडी बाद झाल्याने त्यांना २२५ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे ४६ धावांनी पराभव पत्करावा लागला.
अर्शदीपचा पंजा
न्यूझीलंडला गुंडाळण्यात अर्शदीपने प्रमुख भूमिका बजावली. अर्शदीपने ४ ओव्हरमध्ये ५१ रन्सच्या मोबदल्यात ५ विकेट्स मिळवल्या. अक्षरने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला तर वरुण चक्रवर्ती आणि रिंकू सिंह या दोघांनी १-१ विकेट मिळवत इतरांना चांगली साथ दिली.

