मुंबई : प्रतिनिधी
यंदाच्या हंगामाची सुरुवात पंजाबने अत्यंत दिमाखात केली होती. फलंदाजीपासून क्षेत्ररक्षणापर्यंत प्रत्येक आघाडीवर संघ सरस ठरला होता. पहिल्या सात सामन्यांपैकी सहा सामने जिंकून आणि एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने पंजाबने १३ गुणांसह अनेक दिवस गुणतालिकेत अव्वल स्थान भूषवले होते. मात्र, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर पंजाबची लय पूर्णपणे बिघडली. फलंदाजांचे अपयश आणि गोलंदाजांची महागडी गोलंदाजी यामुळे संघाला सलग चार पराभव पत्करावे लागले आहेत.
संघाची कामगिरी घसरताच सोशल मीडियावर पंजाबच्या खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले. इतकेच नव्हे, तर कर्णधार श्रेयस अय्यरवर संघातील इतर खेळाडू नाराज असून संघात दोन गट पडल्याचे दावे काही युजर्सनी केले. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या या चर्चांमुळे संघाची प्रतिमा मलिन होत असल्याचे पाहून प्रीती झिंटाने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कडक शब्दांत आपली बाजू मांडली.
प्रीती झिंटाने दिले चोख प्रत्युत्तर
टीका आणि जाणीवपूर्वक केलेली बदनामी यात मोठा फरक आहे अशा शब्दांत प्रीतीने टीकाकारांना सुनावले. तांत्रिक मुद्यांवरील टीकेचे स्वागत आहे, पण खोट्या अफवा पसरवून संघाची आणि खेळाडूंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा तिने दिला आहे.
















