आता कमिटी नाही, पटोले संतप्त
मुंबई : प्रतिनिधी
मागील निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे उभे होते, त्यावेळी काही गद्दारांनी पक्षविरोधी काम केले होते. यावेळीही काही बदमाश फुटीर गद्दारांनी पक्षशिस्तीचा भंग करून पक्षाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन काम केले. ते लोक कोण आहेत, ते आम्ही ओळखले असून त्यांची नावे आम्ही पक्षश्रेष्ठींना पाठवली आहेत. यावेळी कमिटी वगैरे काही नाही. फुटीरांना असा धडा शिकवू की त्यांनी पुन्हा अशी हिम्मत करता कामा नये, त्यांना घरचा रस्ता दाखविण्यात येईल, अशी संतापजनक आणि आक्रमक प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
द्वैवार्षिक विधान परिषद निवडणुकीत निकालांतून काँग्रेस पक्षाची आठ मते फुटल्याचे समोर आले आहे. मागील निवडणुकीवेळीही काँग्रेस पक्षाची मते फुटली होती. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती झाल्याने पक्षावर मोठी नामुष्की ओढावली. याच पार्श्वभूमीवर निवडणूक निकालानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अतिशय आक्रमक अंदाजात सगळ््याच नेत्यांनी फुटीर आमदारांविषयी भाष्य केले.
भाजप आज आसुरी आनंद साजरा करत आहे, त्यांनी तो जरूर करावा. पण महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट पाहात आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष भाजपने फोडला. फोडाफोडी ही भाजपची परंपरा राहिलेली आहे. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आमदार फुटले हे उघड आहे. मात्र त्यांना असा धडा शिकवू की पुन्हा ते अशी हिंमत करणार नाहीत, असे पटोले म्हणाले.