छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला माजी खासदार चंद्रकांत खैरे गैरहजर होते. यावरून खैरे यांनी मेळाव्याला दांडी मारल्याचे गोटात चर्चा होती. आपल्याला या कार्यक्रमाला बोलविलेच गेले नाही, असा सूर खैरे यांनी लावला आहे. तसेच विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंवर जोरदार टीका केली आहे.
मेळाव्याला दांडी मारली हे म्हणणे अती उत्साही आहे. नागपूरमध्ये २ महिन्यांपासून ठरलेला कार्यक्रम होता, तिकडे गेलो होतो. मात्र, कालच्या पक्षाचा कार्यक्रम असल्याबाबत मला कुणी सांगितले नाही. मला कार्यकर्त्यांसोबत बोलायचे होते, मात्र मी नसताना यांनी कार्यक्रम उरकला, असे ते म्हणाले.
मला आमंत्रण नव्हते, पत्रिकेत माझे नाव नव्हते. मला डावलून कसे चालेल. उद्धव ठाकरे संकटात आहेत, एकत्र येऊन काम करावे लागेल. कुणी गटबाजी करत असेल, तर मला हे मान्य नाही. मी मरेन, पण पक्ष सोडणार नाही. तरी काही लोक काड्या करत राहतात. अनेक जण कुठे कुठे जातात, कोण कसे सेटलमेंट करतात मला माहिती आहे. कार्यक्रम असा अचानक होतो का? मी स्वत: कार्यक्रमासाठी छोट्या मोठ्याना फोन करतो. पक्ष मोठा करायचा यांनी सोडून दिले आबे आणि गटबाजी करत बसले आहेत. मी अजूनही काम करतो. अनेक लोक सोडून चालले आहेत, बरे नाही ते, आम्ही मदत करायला हवी, असे खैरे म्हणाले.
मेळाव्याचे अंबादास दानवेनी मला सांगितले नाही. मी उद्धव साहेबाना सांगणार आहे. तक्रार करणार आहे. अंबादास मोठा झाल्यासारखा वागतो, शिवसेना मी वाढवली. हा नंतर आला आणि काड्या करण्याचे काम करतो. तो मला बोलतच नाही, मी माझे आंदोलन करणार तो करेल न करेल. आंदोलन आम्ही करणार आणि नक्की करणार. पक्ष चालवायचा असेल, तर एकत्र राहिले पाहिजे. या माणसांमुळे शिवसेनेतील अनेक लोक फुटले, या माणसाने काय केले सांगा. अनेक लोक सोडून जात आहेत, अशी टीका खैरे यांनी दानवेंवर केली.
याचबरोबर संदिपान भुमरे या माणसाबद्दल मला बोलायचे नाही, असेही खैरे म्हणाले. संदिपान भुमरेंनी निवडणुकीत १२० कोटी वाटले. म्हणून निवडून आले. पैसे वाटले, दारू वाटली, दारू पाजून मते घेतली. त्या माणसाबद्दल मला बोलायचे नाही, असे खैरेंनी सांगितले.