भंडारा : प्रतिनिधी
गेल्या तीन वर्षांमध्ये राज्याचे राजकारण पूर्णत: बदलले आहे. आधी एकमेकांचे मित्र असलेले राजकारणी आता एकमेकांचे कट्टर विरोधक झाले आहेत. असेच एक नाव आहे, ते भंडारा जिल्ह्यातील खासदार प्रफुल्ल पटेल आणि आमदार नाना पटोले यांचे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत या दोघांमधील आरोप-प्रत्यारोप महाराष्ट्राने पाहिले. पण एका कार्यक्रमानिमित्त हे दोन्ही एकत्र आल्यानंतर त्यांच्या एका कृतीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, पटेल हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. महाविकास आघाडीतून अजित पवारांचा गट बाहेर पडल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील राजकारणात मोठा बदल झाला.
काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल हे एकमेकांचे कट्टर विरोधक बनले असून भंडारा जिल्ह्याच्या पिंपळगाव येथे शंकरपट शताब्दी महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.
घेतली गळाभेट
राजकारणाच्या मंचावरून एकमेकांवर आरोप करणारे, टीका करणारे नेते यावेळी मात्र चक्क एकमेकांची गळाभेट करताना पाहायला मिळाले. तर या दोन्ही नेत्यांमध्ये ब-याचवेळी चर्चा सुद्धा झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु, यांची गळाभेट म्हणजे भविष्यातील इतर काही संकेत तर नाही ना, असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे.