नवी दिल्ली : प्रतिनिधी
कौटुंबिक वादात घटस्फोटावेळी पतीकडून पत्नीला पोटगी मिळण्याचा अधिकार आहे. कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार पत्नीला ठराविक रक्कम पोटगी म्हणून मिळते. मात्र जेव्हा पतीचा पगार वाढतो, तेव्हा ही पोटगीची रक्कमही वाढते का?, या प्रकरणावर दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. जर पतीच्या उत्पन्नात किंवा पेन्शनमध्ये वाढ झाली असेल तर पोटगी वाढवण्यासाठी हा एक सक्षम आधार आहे. त्यामुळे पतीचा पगार आणि दररोजचे खर्च वाढत असतील तर विभक्त राहणा-या पत्नीला मिळणारी पोटगी वाढवणे गरजेचे आहे असे हायकोर्टाने सुनावणीवेळी म्हटले.
कोर्टाने ही टिप्पणी एका वृद्ध महिलेने केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना केली आहे. या महिलेने कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले, ज्यात विभक्त पतीकडून मिळणारी पोटगी रक्कम वाढवण्याची याचिका फेटाळली होती. यावर न्या. स्वर्णकांता शर्मा म्हणाल्या की, जीवनात वाढणारे खर्च आणि पतीचा वाढलेला पगार या गोष्टी पोटगीची रक्कम वाढवण्यासाठी योग्य कारण असू शकतात. पतीच्या उत्पन्नात वाढ, दैनंदिन जीवनात वाढणारे खर्च आणि परिस्थितीनुसार पोटगीची रक्कमही वाढवणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
तसेच पती सध्या निवृत्त झाले आहेत, ते ज्येष्ठ नागरिक आहेत तरीही पत्नीला सन्मानपूर्वक जीवन जगण्यास सक्षम बनवण्यासाठी एक संतुलन साधणे आवश्यक आहे. विभक्त पत्नीच्या देखभालीसाठी लागणारी रक्कम वाढवल्यास हे संतुलन टिकेल असे हायकोर्टाने स्पष्ट केले.