नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नवी दिल्लीत जीएसटी कौन्सिलची ५६ वी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ५ टक्के आणि १८ टक्के जीएसटी दरप्रणालीला मंजूरी देण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत माहिती दिली. जीएसटी परिषदेच्या या निर्णयामुळे देशभरातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, साबण, कपडे, पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या गोष्टी स्वस्त होणार आहेत. तर आरोग्य विमा आणि जीवन विम्यात पूर्ण सूट मिळण्याची शक्यता आहेत. सरकारचा हा निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. जीएसटी परिषदेने मात्र सोन्यावरील जीएसटी दर बदललेला नाही.
सोने आणि चांदीवरील जीएसटी दर आहे तोच ठेवण्याचा निर्णय घेतला. सोने आणि चांदीवर ३ टक्के जीएसटी आणि दागिने बनवण्याच्या शुल्कावर ५ टक्के जीएसटी लागू राहील. उदाहरणार्थ, जर तुम्ही १ लाख रुपयांचे सोने आणि चांदी खरेदी केली तर तुम्हाला त्यावर ३००० रुपये जीएसटी भरावा लागेल.
- सोने अन् चांदीच्या किंमतीत वाढ
सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ होण्याचा ट्रेंड सुरूच आहे. भारतीय सराफा बाजारात आज देखील म्हणजेच ४ सप्टेंबर रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ दिसून आली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत १०८६९५ रुपयांवर पोहोचली आहे. त्याचवेळी, चांदीच्या किंमतीतही वाढ दिसून आली आहे. - औषधे स्वस्त होणार
आरोग्य विमा, पनीर पराठा, परोटा,खाकरा, चपाती, तंदूर रोटी, दूध, पिझ्झा, ३३ जीवनरक्षक औषधे, गंभीर आणि दुर्मिळ आजारांवरची औषधं, पेन्सिल, शार्पनर, क्रेयॉन्स, खोडरबर, वह्या, नकाशे, चार्ट, ग्लोब या वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी लागणार आहे. - पुढील वस्तूंवर फक्त ५ टक्के जीएसटी
इलेक्ट्रीक गाड्या, केसांचे तेल, शाम्पू, टूथपेस्ट, टूथ ब्रश, साबण, दाढीचे साबण, बटर, तूप, चीज, पाकिटातले नमकीन, भुजिया, मिक्श्चर, बाळाची दुधाची बाटली, डायपर, नॅपकिन्स, शिलाई मशिन आणि तिचे सुटे भाग, थर्मोमीटर, ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रीप्स, चष्मे, रोगनिदानाची उपकरणे, ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे टायर्स, सुटे भाग, जलसिंचन, तुषारसिंचनाची उपकरणे, कृषी उपकरणे, कृषी फवारणी औषधांवर फक्त ५ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे.