परभणी : परभणी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा प्रचारासाठी गावोगावी झंझावाती दौरा सुरू आहे. या दौ-यात ते नागरीकांशी विविध विषयांवर संवाद साधून जिल्ह्यातील समस्या तसेच विकासाच्या दृष्टीने नागरीकांच्या अपेक्षा जाणून घेत आहेत. विशेष म्हणजे लग्न सोहळा, धार्मिक कार्यक्रम अशा ठिकाणी उमेदवार आवर्जुन हजेरी लावत आहेत.
याच पार्श्वभुमीवर गंगाखेड शहरातील मार्केट यार्ड परिसरात मॉर्निंग वॉक ग्रुपचे सर्व सदस्य व क्रिकेट खेळाडू यांच्याशी महायुतीचे उमेदवार जानकर यांनी संवाद साधला. महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे राहण्याचे मतदारांना आवाहन यावेळी केले. यावेळी प्रचाराच्या रणधुमाळीत सुध्दा जानकर यांना स्वत:साठी वेळ काढत मैदानावर उतरत हातात बॅट घेवून जोरदार फटकेबाजी करीत आपण जबरदस्त बॅटसमन असल्याचे दाखवून दिले.
क्रिकेटच्या मैदानावर जानकरांनी केलेल्या फटकेबाजीचा उपस्थितांनी देखील मनमुराद आनंद घेतला. या नंतर संपूर्ण दिवसभर गावामध्ये जानकर यांनी क्रिकेट खेळल्याची चर्चा नागरीकातून होताना दिसून येत होती