वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
जगभरातील अनेक देशांतील लोक झपाट्याने आपला धर्म सोडताना दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे, प्रौढांपैकी प्रत्येक पाचवी व्यक्ती अथवा याहूनही अधिक लोक ते जन्माला आलेला धर्म सोडताना दिसत आहेत. अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील थिंक टँक प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार, या धार्मिक परिवर्तनाचा सर्वाधिक फटका ख्रिश्चन आणि बौद्ध धर्माला बसत आहे.
३६ देशांतील जवळपास ८०,००० प्रौढांमध्ये झालेल्या या सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार, जे लोक आता कुठलाही धर्म मानत नाहीत, जे कुठल्याही धर्माशी संबंधित नाहीत, अशा लोकांची संख्या वाढत आहे.
जगभरातील देशांचा विचार करता धार्मिक परिवर्तनाच्या दरात मोठा फरक दिसतो. काही देशांत धर्म बदलणे, ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. भारत, इस्रायल, नायजेरिया आणि थायलंडमध्ये, ९५% अथवा त्याहूनही अधिक वयस्क लोक म्हणतात की, आपण अद्यापही ज्या धर्मात जन्माला आलो आणि वाढलो त्याचाच भाग आहोत.
मात्र, पूर्व आशिया, पश्चिम युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत आपला धर्म सोडणे सामान्य गोष्ट झाली आहे. याचे उदाहरणच द्यायचे झाल्यास, दक्षिण कोरियातील ५०%, नेदरलँडमधील ३६%, अमेरिकेतील २८% आणि ब्राझिलमधील २१% प्रौढ, आता स्वत:कडे, ते जन्माला आलेल्या धर्माशी जोडून बघत नाहीत.
याशिवाय, नास्तिक लोकही धार्मिक होताना दिसत आहेत. सर्वेक्षणानुसार, आपले पालन-पोषण कुठल्याही धर्माने झाले नाही. मात्र आज आपला धर्म आहे (९%) असे म्हणणारे लोक दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक आहेत. यांपैकी, ६% लोक आपण ख्रिश्चन असल्याचे सांगत आहेत. तसेच, सिंगापूर (१३%), दक्षिण आफ्रिका (१२%) आणि दक्षिण कोरिया (११%) पैकी जवळपास दहा पैकी एक अथवा त्याहून अधिक लोकांनी दोन धर्मांत स्विच केले आहे.
कोणता धर्म स्वीकारताहेत लोक?
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अधिकांश लोक सांगतात की ते नास्तिक आहेत. अज्ञेयवादी अर्थात अशी व्यक्ती, जी ईश्वराच्या अस्तित्वासंदर्भात अथवा स्वरूपासंदर्भात काहीही माहीत नाही अथवा जाणले जाऊ शकते, असे मानते. यातील बहुतांश लोक ख्रिश्चन धर्मात वाढलेले आहेत. उदाहरणार्थ, स्वीडनमधील २९% प्रौढ म्हणतात की ते ख्रिश्चन धर्मात वाढले आहेत. मात्र ते आता स्वत:ला धार्मिकदृष्ट्या नास्तिक अथवा अज्ञेयवादी म्हणवतात.
बौद्ध अनुयायीही सोडताहेत धर्म
काही देशांमध्ये, बौद्ध धर्माचे अनुयायी देखील धर्मापासून दूर जात आहेत. उदाहरणार्थ, जपानमध्ये सर्वेक्षण केलेल्यांपैकी २३%, तर दक्षिण कोरियात १३ टक्के लोक सांगत आहेत की, ते पूर्वी बौद्ध होते, मात्र आता कोणत्याही धर्मात नाहीत.