नांदेड : प्रतिनिधी शहरातील शिवनगर भागात पल्लेवाड हॉस्पिटलच्या पाठीमागे सोमवारी, ७ सप्टेंबर रोजी, एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत तरुणाचे नाव चतुर दिलीप ढेंबरे (वय २६, रा. नागसेन नगर) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिरसाठ तसेच पोलीस अंमलदार गजानन कांबळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
दरम्यान, मृतदेहाच्या परिसरात व्हाईटनरच्या सात ते आठ बाटल्या आढळून आल्याची माहिती आहे. चतुर ढेंबरे याने मद्यप्राशन केले असल्याचेही प्राथमिक स्वरूपात सांगण्यात येत आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण उत्तरीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
















