26.2 C
Latur
Tuesday, July 29, 2025
Homeराष्ट्रीयपहलगाम हल्ल्यातील २ अतिरेक्यांचा खात्मा

पहलगाम हल्ल्यातील २ अतिरेक्यांचा खात्मा

पहलगाम हल्ल्यातील नेटवर्कविरोधात कारवाई
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. आता या हल्ल्याच्या ९७ दिवसांनंतर अखेर भारतीय सैन्याला मोठे यश मिळाले असून, ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत भारतीय सैन्याने ३ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला. यापैकी दोघे पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आहेत. ही चकमक सोमवारी श्रीनगरमधील लिडवास परिसरात झाली. चिनार कॉर्प्सने ही माहिती दिली असून, ही कारवाई पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार दहशतवादी नेटवर्कविरोधात करण्यात आल्याचे सांगितले.
काश्मिरातील लिडवास परिसरात सुलेमान, यासिर आणि अली या ३ पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मृतदेह मिळाले. त्यापैकी सुलेमान आणि यासिर हे पहलगाम हल्ल्यात सामील होते, अशी माहिती समोर आली आहे. तथापि, सैन्याच्या वतीने यासंदर्भात अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. सध्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. श्रीनगरमधील दाचिगाम राष्ट्रीय उद्यानाजवळील हरवन परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाल्याची माहिती लष्कराने दुपारी दिली. लष्कराच्या चिनार कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, ऑपरेशन महादेव-जनरल एरिया लिडवासमध्ये संपर्क स्थापित झाला. येथे झालेल्या कारवाईत तीन दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी हरवनच्या मुलनार भागात कारवाई केली.

हत्यारांचा मोठा साठा जप्त
चकमकीनंतर दहशतवाद्यांकडून अमेरिकन एम-४ कार्बाइन, एके-४७ रायफल, १७ रायफल ग्रेनेड आणि इतर संशयास्पद सामग्री जप्त करण्यात आली. ऑपरेशननंतर परिसरात लष्कर आणि सुरक्षा दलांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे सकाळी शोधमोहीम सुरू करण्यात आली होती, असे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR