जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देण्यावर भर दिला जात असून, आता महाराष्ट्र सरकारनेही या संदर्भाने महत्त्वाची घोषणा केली. महाराष्ट्र भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करणार असल्याचे राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी (२३ जाने.) जाहीर केले.
जागतिक शिक्षण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले की, कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय हा राज्य सरकारचा ऐतिहासिक प्रकल्प ठरणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रालयाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जाणार आहे. तंत्रज्ञान विभाग आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीने प्रेरित उद्योग आणि तंत्रज्ञान क्रांतीसाठी विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करणारे हे विद्यापीठ असेल, असे शेलार यांनी सांगितले.
हे विद्यापीठ अत्याधुनिक संशोधन आणि कौशल्य विकासासाठी केंद्रस्थानी राहील. इतकेच नाही तर हे विद्यापीठ भारतीय तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जागतिक अर्थव्यवस्थेत आणि बदलांचे नेतृत्व करण्यासाठी तयार करेल, असे मंत्री आशिष शेलार म्हणाले. सरकार लवकरच देशातील पहिले राज्यस्तरीय कृत्रिम बुद्धिमत्ता व सायबर धोरण जाहीर करणार असून, यासाठी एक विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती शेलार यांनी यावेळी दिली.