कराची : वृत्तसंस्था
पाकिस्तानमध्ये गेल्या ६ दिवसांत अति उष्णतेमुळे ५६८ लोकांचा मृत्यू झाला. मंगळवारी (२५ जून) १४१ जणांना आपला जीव गमवावा लागला. पाकिस्तानातील सर्वात मोठे शहर कराचीमध्ये २४ जून रोजी पारा ४१ अंश सेल्सिअस होता. गेल्या महिन्यात कराचीमध्ये ५२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हा या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस होता.
अहवालानुसार, गेल्या तीन दिवसांत तापमानात घट नोंदवण्यात आली. मात्र हवेतील ओलावा जास्त असल्याने आर्द्रता वाढत आहे. यामुळे ४० अंश तापमानही ४९ अंशांसारखे वाटते. गेल्या ४ दिवसांत उष्माघातामुळे २६७ लोकांना कराची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
इधी फाऊंडेशन या पाकिस्तानी स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख फैसल यांनी सांगितले की ते कराचीमध्ये ४ शवागारे चालवत आहेत, परंतु परिस्थिती अशी आहे की मृतदेह ठेवण्यासाठी शवागारांमध्ये जागा उरलेली नाही. येथे दररोज ३०-३५ मृतदेह येत आहेत. डॉन न्यूजनुसार, आपत्कालीन सेवा कर्मचा-यांना कराचीच्या रस्त्यावर आतापर्यंत ३० लोकांचे मृतदेह सापडले आहेत.
पाकिस्तानी हवामान विभागाचे अध्यक्ष सरदार सरफराज यांनी सांगितले की, कराचीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेपासून आज काहीसा दिलासा मिळू शकतो. शहरात मुसळधार पावसाची शक्यता असून, त्यामुळे तापमान ४० ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
तिसरा सर्वात उष्ण दिवस
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानातील मोहेंजोदारोमध्ये पारा ५२ अंशांच्या पुढे गेला होता. पाकिस्तानच्या इतिहासातील हा तिसरा सर्वात उष्ण दिवस होता.