मराठवाड्यात पावसाचा कहर, नद्यांना महापूर, शेतशिवार पाण्यात, अनेक गावांचा संपर्क तुटला, हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला, पशुधन दगावले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त
छ. संभाजीनगर/लातूर : प्रतिनिधी
मराठवाड्यासह राज्यात पावसाने धुमाकूळ घातला. मराठवाड्यात तर पाऊसच थांबत नसल्याने सर्वत्र हाहाकार उडाला असून, अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात कष्टाने पिकवलेली पिके मातीमोल झाली असून, उभी पिके चिखलात रुतली आहेत. नद्या ओसंडून वाहात असल्याने पुराचे पाणी पात्राबाहेर पडल्याने शेतशिवार पाण्यात बुडाला असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पुरात जनावरे वाहून गेली. घरांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने अनेकांचा आधार कायमचा हरवला गेला. नांदेडमध्ये दोघांचा बळी गेला. ३५ शेळ््या वाहून गेल्या. बैलही दगावले. लातूर, धाराशिव, बीडमध्ये पुराने जनजीवन विस्कळीत झाले. सोलापुरात स्थलांतरितांना मदत मिळत नसल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे.
गेल्या आठवडाभर पावसाने मराठवाड्याला झोडपल्यानंतर धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले . लातूर जिल्ह्यात तर मांजरा, तावरजा, रेणा, तेरणा नदीला पूर आला असून, नदीपात्राबाहेर पाणी पडत असल्याने शेतशिवार पाण्याखाली गेला आहे. तसेच अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहात असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जळकोट तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वेळ सांगवी गावाला पाण्याने वेढा दिला. त्यामुळे बचाव पथके बोलावण्यात आली. लातूर तालुक्यासह निलंगा, औसा, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर, उदगीर, चाकूर, रेणापूर, देवणी तालुक्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
बीड जिल्ह्यातही अतिवृष्टीने हाहाकार उडाला असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. जिल्ह्यात माजलगाव आणि मांजरा धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. माजलगाव धरणाचे ११ दरवाजे उघडले असून, सिंदफणा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आल्याने सिंदफणा नदीला पूर आला आहे. केजमधील धनेगाव येथील मांजरा धरणाचे ६ दरवाजे उघडले असून २७१६६ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. यामुळे सिंदफणा आणि मांजराकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. यासोबतच जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही परिस्थिती गंभीर असून शेतकरी देशोधडीला लागला आहे.
धाराशिव जिल्ह्यातही शेतीपिके पाण्याखाली गेली असून, पुराच्या तडाख्यात पिके हातातून गेली आहेत. तेरणा, मांजरा, सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेक गावांना महापुराचा वेढा बसला. काढणीला आलेल्या सोयाबीनमध्ये पाणी साठल्याने पिकांची नासाडी झाली आहे. जिल्ह्यात ५ महिन्यांपासून पाऊस सुरू असल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले.
परभणी जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्प तुडुंब भरले असून, सर्वच नद्यांना पूर आला आहे. या नद्या धोक्याच्या पातळीवर वाहू लागल्या आहेत. त्यातच निम्न दुधना, येलदरी, पूर्णा, मुरली आणि लहान प्रकल्पांतून विसर्ग सोडण्यात आल्याने गोदावरी, पूर्णा, कयाधू, दुधना यासह लहान नद्यांचा प्रवाह वाढला आहे. अतिवृष्टी व पुरामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका यासह संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. दोन ते अडीच लाख हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील गंगाखेड-राणीसावरगाव, गंगाखेड-पालम, पूर्णा-नांदेड हे राज्य महामार्ग बंद करण्यात आले.
कयाधू नदीला महापूर
हिंगोली जिल्ह्यातही शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यात हाहाकार सुरू असून, कयाधू नदीला महापूर आल्याने कळमनुरी तालुक्यातील कोंडूर-डिग्रस या गावांना पुराने वेढा घातला. पुरामुळे नदीकाठावरील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. गावांत पाणी शिरल्यामुळे सर्वत्र दाणादाण उडाली.