21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरपाणीटंचाईग्रस्त ३८७ गावांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत

पाणीटंचाईग्रस्त ३८७ गावांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत

लातूर : प्रतिनिधी
गतवर्षीचा जेमतेम पाऊस आणि यंदाचा कडक उन्हाळा यामुळे जिल्ह्यातील धरण, तलाव, विहिरींतील जलसाठे आटले आहेत. भूजलपातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. सध्या जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या चारशेपार झाली आहे. अधिग्रहणासाठी ६६७ प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यापैकी २९० गावांना ३५९ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात असून ३८७ गावांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.
पाऊस आणि लातूर जिल्हा यात एक वेगळे समिकरण आहे. मान्सूनचा पाऊस जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीएवढाही पडत नाही आणि अवेळी, बेमोसमी पाऊस पडून शेतक-यांचे प्रचंड नुकसान होते. गतवर्षी पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्याएवढेही पर्जन्यमान जिल्ह्यात झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांना हिवाळ्यापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली होती. प्रकल्पांमध्ये अपेक्षीत जलसाठा झाला नाही. यंदा सर्वाधिक कडक उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे पाणीपातळी आणि भूजलपातळी खालावली आहे.
जिल्ह्यातील भूजलपातळी जवळपास दीड मीटरने घटली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा आणखीन तीव्र झाल्या आहेत. जिल्ह्यातील ३७ गावे आणि २० वाड्या, अशा एकुण ५७ गावांत भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.  टँकर आले की, पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची चढाओढ होत आहे. त्यामुळे गावात नागरिकांची पाण्यासाठी धांदल उडाल्याचे पाहावयास मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR