लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात ऑक्टोबर ते जून दरम्यान पाणी टंचाई निवारण उपाय योजना राबण्यासाठी दरवर्षी संभाव्य कृती आराखडा लातूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून तयार करण्यात येतो. यावर्षी पाणी टंचाई जाणवणार नसली तरी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने १७ कोटी ७० लाख ८ हजार रूपयांचा पाणी टंचाईचा संभाव्य कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
जिल्ह्यात यावर्षी पावसाळयात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे नागरीकही यावर्षी समाधानी झाले आहेत. असे असले तरी जिल्हयात पावसाळयात झालेला पाऊस सर्व तालुक्यात व महसूल मंडळात एकसारखा समान पडला नाही. जिल्हयात एखाद्या मंडळात कमी पाऊस झाल्यास अशा ठिकाणाहून टंचाईच्या उपाय योजनांची मागणी ग्रामीण भागातून होऊ शकते. त्यासाठी लातूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने टंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार करून त्यास जिल्हा प्रशासनाची मंजूरी घेणे आवश्यक असते. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने १७ कोटी ७० लाख ८ हजार रूपयांचा पाणी टंचाईचा संभाव्य कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईची गरज भासल्यास सदर आराखड्याचा उपयोग होणार आहे.