परभणी : स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने दि.६ रोजी मध्यरात्रीनंतर पाथरी परिसरातील माजलगाव रोडवर केलेल्या कारवाईत प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आला. या कारवाईत १५ लाख ९२ हजारांच्या गुटख्यासह एकूण २० लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या संदर्भात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकातील विलास सातपुते यांनी पाथरी पोलीस ठाण्यास माहिती दिली असून यात रविवारी रात्री स्थानिक गुन्हा शाखेचे विवेकानंद पाटील, विलास सातपुते, वाघमारे, चव्हाण, क्षिरसागर, चाटे, ढवळे, डुब्बे, घुगे, सायबरचे गणेश कौटकर यांचे पथक पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. यावेळी त्यांना माजलगाव रोडकडून एका वाहनातून शासनाने प्रतीबंधीत केलेला गुटखा व तत्सम पदार्थ हे पाथरी येथे विक्री करण्यासाठी येणार आसल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अधारे पथकासह पाथरी पोलीस ठाण्याचे व्यंकटेश कुलकर्णी व लोखंडे देखील रवाना झाले. यावेळी पथकाने पाथरी ते माजलगाव रोडवर ढालेगाव येथे सापळा लावला. मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास माजलगाव रोडकडून एक संशयित वाहन येतांना दिसले.
पथकाने सदर वाहनास थांबवले. त्यानंतर चालकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव परवेस खान अलीदाद खान असे सांगितले. सदर वाहनाची तपासणी केली असता यात १५ लाख ९२ हजार रूपयांचा प्रतिबंधित गुटखा, तंबाखू आढळून आले. तसेच ५ लाखांचे वाहन आणि एक मोबाईल असा एकूण २० लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाई दरम्यान पोलिसांनी परवेस खान अलीदाद खान यांची चौकशी केली असता त्याने सदरचा मुद्देमाल त्याने व त्याचा भाऊ आवेस खान अलीदाद खान या दोघांनी मिळून धाराशीव परिसरातील बाळू आडणे याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात आरोपींविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.