रायगड, नाशिकवरून वाद, अर्थसंकल्पीय तरतुदींसाठी आज बैठक
मुंबई : प्रतिनिधी
वादग्रस्त जिल्ह्यांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसीठीच्या बैठका शेवटच्या दिवशी ठेवण्यात आल्याचे दिसून आले. रायगड आणि नाशिक जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद रखडल्याने अर्थसंकल्पीय तरतुदीसंदर्भातील बैठका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढे ढकलली. या २ जिल्ह्यांच्या बैठका आता मंगळवारी घेण्यात येणार आहेत.
अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी जिल्हानिहाय बैठका जवळपास संपत आलेल्या आहेत. मात्र वादग्रस्त जिल्ह्यांच्या काही बैठका या शेवटच्या दिवशी, मंगळवारी घेतल्या जाणार आहेत. सोमवारी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याची बैठक पार पडली. मात्र रायगडची बैठक पुढे ढकलण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या बैठका सोमवारी पार पडल्या. मात्र, नाशिक जिल्ह्यासंदर्भातील बैठक ही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारी शेवटच्या दिवशी रायगड, नाशिक, मुंबई, ठाणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांच्या बैठका पार पाडणार आहेत.
नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सुमारे महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात नव्या पालकमंत्र्यांची घोषणा झाली. मात्र, त्या निर्णयाला २४ तास उलटायच्या आतच दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला सरकारने स्थगिती दिली. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून शिंदेंच्या शिवसेनेतील नाराजी इतकी उफाळून आली की या दोन्ही ठिकाणच्या नियुक्त्यांना स्थगिती मिळाली. आधी नाशिकच्या पालकमंत्रिपदावर भाजपचे गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावर आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा झाली होती. मात्र शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधानंतर हे दोन निर्णय मागे घेण्यात आले आहेत.
रायगडवर गोगावलेंचा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेच्या भरत गोगावले यांनी दावा केला आहे. रायगडमध्ये सेनेचे तीन आमदार असून पालकमंत्रिपद आपल्यालाच मिळालं पाहिजे असं सांगत शिवसेनेने आदिती तटकरे यांच्या नावाला विरोध केला. त्यामुळे पालकमंत्रिपदाचा वाद अद्याप सुटला नाही.