भाजपची समांतर यंत्रणा, मित्रपक्षांवर कुरघोडी!
मुंबई : प्रतिनिधी
रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा विषय अद्याप रखडलेला असताना आता भारतीय जनता पक्षाने जिल्हा संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर केली. विशेष म्हणजे भाजपच्या मंत्र्यांकडे पालकमंत्रिपद असलेल्या एकाही जिल्ह्यासाठी भाजपने जिल्हा संपर्क मंत्री दिलेला नाही तर मित्रपक्षांचे पालकमंत्री असलेल्या १७ जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्री जाहीर केले आहेत. त्यामुळे मित्रपक्षांकडे गेलेल्या जिल्ह्यांमध्ये भाजप आपली समांतर यंत्रणा निर्माण करतोय का, अशी चर्चा रंगू लागली आहे.
सत्तेत मोठा भाऊ असलेल्या भाजपने १७ जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्री जाहीर केले. त्यासाठी १७ नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असलेल्यांना भाजपने मित्रपक्षांचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांचे संपर्क मंत्रिपद दिले आहे. पक्ष आणि सरकारमध्ये समन्वय ठेवण्यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. पण मित्रपक्ष असलेल्या जिल्ह्यांमध्येच संपर्क मंत्र्यांची नियुक्ती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे, बीडचे पालकमंत्रिपद आहे. भाजपने पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्याकडे संपर्क मंत्रिपद दिले तर बीडमध्ये हीच जबाबदारी पंकजा मुंडेंकडे देण्यात आलेली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे, मुंबई शहरचे पालकमंत्रिपद आहे. भाजपने ठाण्याची जबाबदारी गणेश नाईक आणि मुंबई शहरची जबाबदारी मंगलप्रभात लोढांकडे दिली आहे. गणेश नाईक आधीच ठाण्यात जाऊन ओन्ली कमळ म्हणत शिंदेंना थेट अंगावर घेत असताना आता भाजपने त्यांच्या मागे संपर्क मंत्रिपदाची ताकद उभी केली आहे.