लातूर : प्रतिनिधी
राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रदीप ढेले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. वैद्यकीय उपचासाठी मदत मिळावी याकरिता गरजू रुग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात. अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार येतात. रुग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दुरदृष्टीतून रुग्ण व नातेवाईकांची परवड थांबविण्याच्या उद्देशातून जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे.