लाहोर : पावसामुळे अफगाणिस्तानचे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. मिळालेल्या एका गुणाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा संघ सेमी फायनलमध्ये दाखल झाला. ऑस्ट्रेलियाची १२.५ षटकांत १ बाद १०९ अशी अवस्था असताना पावसाचे आगमन झाले आणि खेळ थांबवण्यात आला. त्यामुळे सेमी फायनलमध्ये कोणता संघ पोहोचणार, याची उत्सुकता सर्वांना लागलेली होती. अखेर पंचांनी पावसामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा फटका अफगाणिस्तानला बसला. दोन्ही संघाला एक-एक गुण दिले. यात एका गुणाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा संघ सेमिफायनलमध्ये दाखल झाला.
आता अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचे समान गुण असले तरी दक्षिण आफ्रिकेचा रन रेट जास्त असल्याने ते सेमी फायनलमध्ये पोहोचतील, असे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलियाचे पाच गुण झाले आहेत, जे अफगाणिस्तान आणि इंग्लंडचे होऊ शकत नाहीत. दरम्यान, ऑस्ट्रेलिया सेमिफायनलमध्ये पोहोचला असला तरी जर इंग्लंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठ्या फरकाने पराभूत केले तर अफगाणिस्तानला आणखी एक संधी मिळू शकते. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते, या गोष्टीवरच अफगाणिस्तानचे भवितव्य टिकून असणार आहे.
आजच्या अफगाणिस्तानच्या २७४ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज सुरुवात केली. ट्रेव्हिस हेडने अर्धशतकही पूर्ण केले. मॅथ्यू शॉर्ट बाद झाल्यावर स्टीव्हन स्मिथ हेडला चांगली साथ देत होता. खेळ थांबला तेव्हा हेडने ४० चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५९ धावांची खेळी साकारली होती. त्याचवेळी सामना रद्द झाला.