30.1 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeलातूरपावसाळ्यात विद्युत अपघात टाळण्यासाठी सतर्क रहा!

पावसाळ्यात विद्युत अपघात टाळण्यासाठी सतर्क रहा!

लातूर : प्रतिनिधी
पावसाळयात पाऊस व वादळी वा-यामुळे महावितरणच्या वीजयंत्रणेला मोठा फटका बसत असतो. विजेच्या तारा तुटने, विजेचे खांब कोसळणे, रोहित्र कोसळणे त्याचबरोबर करंट उतरणे, अशा घटना घडत असतात. त्यामुळे काही प्रसंगी दुर्घटनाही घडतात. त्यामुळे पावसाळ्यात होणारे संभाव्य विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळण्याचे व खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणने नागरिकांना केले आहे.
मुसळधार पाऊस व जोरदार वा-यामुळे तुटलेल्या फांद्या वीज वाहीनीच्या तारांवर अडकून पडल्या असल्यास त्या स्वत: काढण्याचा प्रयत्न करु नये. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला वा मोडला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणा-या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटवण्याचा प्रयत्न करु नये आणि त्वरित महावितरणशी संपर्क साधावा. घरात बसवलेल्या मीटरवर पाणी पडत असल्यास किंवा मीटर असलेली भिंत ओली असल्यास त्वरित महावितरणशी संपर्क साधावा. विजेच्या पोलला हात लावू नये. खांबाच्या स्टेवायरला गुरे-ढोरे बांधू नयेत तसेच कपडे वाळत घालण्यासाठी स्टेवायरचा वापर करु नये.
घरामध्ये असलेली विद्युत यंत्रणा व घराजवळ असलेली अर्थिंग मान्यताप्राप्त कंत्राटदाराकडून तपासून घ्यावी. अपार्टमेंटच्या मीटर बॉक्सची स्वच्छता राखावी भिंतीमध्ये पाणी मुरणार नाही याची काळजी घ्यावी. स्वीच बोर्डापासून मोटारीपर्यंत जाणा-या वायरला जोड देऊ नये. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेन स्वीच तत्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अँटेना वीज तारांपासून दूर ठेवावा. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीच बोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही याची दक्षता घ्यावी. विशेषत: टिन पत्र्यांच्या घरात राहणा-या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अशा प्रसंगी खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि फिडर बंद करण्यात येतो. त्यामुळे वीजपुरवठा काही कालावधीसाठी बंद होतो. अशा स्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR