शिरूर अनंतपाळ : शकील देशमुख
तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत असताना खासगी वॉटर प्लांटचालकांनाही पाण्याची उपलब्धता करून घेण्यासाठी कसरत करावी लागत आहे. खासगी बोअरवेलमधून तसेच विकत पाणी घेऊन हे प्लांट सुरू ठेवले जात आहेत. पाणी विकत घेण्याची वेळ येत असतानाही प्लांटचालकांनी अद्याप जारच्या दरात वाढ केलेली नाही. मात्र पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेची तपासणी करण्याची गरज आहे.
शिरूर अनंतपाळ शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये खासगी तसेच ग्रामपंचायतींच्या माध्यमातून वॉटर प्लांट चालवले जातात. पिण्याच्या पाण्याची मागणी वाढलेली असताना पाणीटंचाईचा फायदा घेत जारच्या दरात वाढ केल्याचे सध्या तरी दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. दरम्यान खासगी वॉटर प्लांटमधून पुरवठा होणारे पाणी शुद्ध व पिण्यायोग्य आहे की नाही, याबाबत प्रशासनाकडून नियमित आणि ठोस तपासणी होत नसल्याची माहिती समोर येत आहे. पिण्याच्या पाण्याचा थेट संबंध नागरिकांच्या आरोग्याशी असल्याने संबंधित विभागाने वॉटर प्लांटमधील पाण्याचे नमुने तपासून त्याच्या गुणवत्तेची खात्री करावी, अशी गरज व्यक्त होत आहे. पाणीटंचाईच्या काळात पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्यासोबतच त्याची शुद्धताही जपणे आवश्यक आहे.
















