बार्शी-नुकसान भरपाई असलेले शेतकरी अद्यापपर्यंत प्रलंबित असल्यामुळे शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बार्शी येथील ओरिएंटल पीक विमा कंपनीच्या कार्यालयावर हलगी नाद करत विविध मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलकांनी सोलापूर येथे झालेल्या मागील आंदोलनाप्रमाणे ओरिएंटल पीक विमा कंपनीच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांस फोनवरुन बोलून त्यांच्याकडून पुन्हा आश्वासन घ्यायची इच्छा व्यक्त केली. परंतु तेथील विमा कंपनीच्या प्रतिनिधीने फोन लावला नाही. त्यामुळे नाईलाजाने कार्यकर्त्यांनी ओरिएंटल पीक विमा कंपनीचे कार्यालय फोडले. यावेळी शरद भालेकर, सचिन आगलावे उपस्थित होते.
राज्यभरातील शेतकऱ्यांना मागील अनेक वर्षांपासून पीक विम्याचे पैसे कमी मिळणे तसेच अनेकांना तर मिळतच नसल्यामुळे त्याचबरोबर सोलापूर जिल्हा पीक विम्यातून वगळल्यामुळे शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष अध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली ओरिएंटल पीक विमा कंपनीचे सोलापूर येथील विभागीय कार्यालयावर दि. १५ मे रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले होते.
त्यावेळी विमा कंपनीचे राज्यप्रमुख विनायक दीक्षित यांनी फोनवरुन लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांना पैसे आले असले तरी ती रक्कम कमी होती. त्यामुळे पुन्हा आंदोलन केले.राज्यातील सर्व पीक विमा कंपन्यांनी मागील दोन वर्षापासून खरीप व रब्बीच्या दोन्ही हंगामातील शेतकऱ्यांची राहिलेली रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी अन्यथा वैतागलेला शेतकरी कोणत्याही स्वरुपाचे तीव्र आंदोलन करू शकतो.असे शेतकरी संघटना राज्याध्यक्ष शंकर गायकवाड यांनी सांगीतले.