21.9 C
Latur
Monday, January 27, 2025
Homeसंपादकीयपुणे तेथे उणेच..उणे!

पुणे तेथे उणेच..उणे!

आजपर्यंत नव्हे कालपर्यंत पुणे शहराची काय ओळख होती? पुणे तेथे काय उणे असे अभिमानाने म्हटले जात होते. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख होती. शिक्षणाचे माहेरघर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची कर्मभूमी म्हणून पुण्याची ओळख होती. या शहराने शौर्याच्या दुर्दम्य शक्तीचे जे दर्शन घडवले होते त्याची इतिहासात नोंद आहे. ऐतिहासिक अनेक सुधारणावादी अथवा प्रबोधनाच्या चळवळी सुरू असणारे एक प्रमुख केंद्र म्हणूनही पुण्याची ओळख होती. विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी म्हणूनही पुण्याचा नावलौकिक सांगितला गेला. आज काय स्थिती आहे? पुणे शहर पूर्णत: बदलले आहे. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. या पाण्यात ‘पुणे शहर राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र’ असा असणारा नावलौकिक वाहून गेला आहे.

पुणे शहराचा नावलौकिक धुळीस मिळण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे गत काही वर्षांपासून प्रचंड वाढलेली गुन्हेगारी त्यात भरीस भर म्हणजे अमली पदार्थांच्या पार्ट्या, या नशेच्या गर्तेत अडकत चाललेली तरुणाई! पुणे ही शिक्षणाची पंढरी आणि संस्कृती जपणारे शहर म्हणून ओळखले जायचे. पण गत काही महिन्यांपासून पुण्यात घडत चाललेल्या घटनांमुळे पुण्याची संस्कृती लयाला गेली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यातील हडपसरमध्ये एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली. विशेष म्हणजे खुद्द मुलीचे वडील, काका आणि चुलत भावाने हा बलात्कार केल्याची तक्रार मुलीच्या आईने केली. कुठे गेले संस्कार? पुण्यात ‘हिट अँड रन’ प्रकरण तर भलतेच गाजते आहे. पोर्शे अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या पुतण्याने कारखाली दोघांना चिरडले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. आमदाराचा पुतण्या दारूच्या नशेत गाडी चालवत होता म्हणे.

अपघातानंतर पुतण्या मयूर गाडीतच बसून राहिला. तो गाडीबाहेर आला नाही आणि त्याने जखमींना मदतही केली नाही. कुठे गेली माणुसकी? पुण्यात ड्रग्ज पार्ट्याही जोरात चालत आहेत. पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी ड्रग्ज व अमली पदार्थाचे सेवन करत पार्टी करतात. पुण्यातील ‘एल-३’ हॉटेलमधील पार्टीत ड्रग्ज घेणा-या तरुणांचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हीडीओमध्ये हॉटेलमधील वॉशरूममध्ये अल्पवयीन मुले ड्रग्ज घेत असल्याचे दिसून आले. पुण्यातील पोर्शे कार अपघाताने राज्य सरकारची अब्रू निघाली आहे. सारे नियम धाब्यावर बसवून पुण्यात पहाटेपर्यंत पबवाले अल्पवयीन मुलांना दारू कशी पुरवतात ते उघड झाले आहे. कधीकाळचे पुणे, सांस्कृतिक पुणे आता गुंडगिरीसाठी बदनाम झाले आहे. गुंडगिरीला राजाश्रय आहे हे आता लपून राहिलेले नाही. पोर्शे कार अपघातातील बालकाला वाचवण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार पहाटे पोलिस ठाण्यात पोहोचले होते. हे सारे संतापजनक आहे.

विशेष म्हणजे अजित पवार यांनी आमदाराचीच बाजू घेतली होती. निवडणुकीत जनतेसमोर हात पसरून मतांची याचना करणारे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर माजतात आणि उद्दामपणे वागणा-या आपल्या नातेवाईक तसेच कार्यकर्त्यांच्या गैरवर्तणुकीला संरक्षण देतात. गावागावांत लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते हुल्लडबाजी करतात, त्यामागे आपल्याला वाचवणारे कुणीतरी आहे ही भावनाच या कार्यकर्त्यांना तसे करण्यास प्रवृत्त करत असते. पुण्यात दरवर्षी लाखो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठीही हजारो विद्यार्थी येतात. परंतु ड्रग्जच्या आहारी जाणा-या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून करिअर, शिक्षण घेणारे विद्यार्थीही कळत-नकळत या ड्रग्जच्या आहारी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचवण्याची गरज आहे. पुणे शहर ड्रग्जच्या विळख्यात अडकत चालले आहे.

त्यामुळे अनेक पिढ्या बरबाद होऊ शकतात त्यामुळे वेळीच ड्रग्जचा विळखा सोडविण्याची गरज आहे. महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ होऊ द्यायचा नसेल तर ड्रग्ज माफिया, बेकायदेशीर पब्ज व्यवसाय, मटका, जुगार, गांजा विक्री अशा बेकायदेशीर व्यवसायांवर बुलडोझर फिरवावा लागेल. राजकीय व प्रशासकीय वरदहस्त असल्याशिवाय कुठलेही काळे धंदे सुरू राहू शकत नाहीत. राज्यात विविध प्रकारचे माफिया निर्माण झाले आहेत त्याला संपूर्णपणे राजकीय, प्रशासकीय व्यवस्थाच जबाबदार आहे. लोकशाही व्यवस्थेत सर्वांत महत्त्वाची भूमिका असते ती लोकप्रतिनिधींची. तेच भ्रष्टाचाराने बरबटलेले असतील तर त्यांचा धाक प्रशासनावर राहत नाही आणि प्रशासन देखील ‘वसुली’त मग्न राहिल्याने काळे धंदे करणा-यांवर धाक उरत नाही. ‘कोयता गँग’च्या विविध घटना समोर येऊन देखील प्रशासनाला, पोलिस यंत्रणेला ‘कोयता गँग’चा बंदोबस्त करता आला नाही.

याचे मुख्य कारण म्हणजे समाजातील गुंडांचे लोकप्रतिनिधी कनेक्शन! पोलिस यंत्रणा राजकारण्यांच्या हातातील कळसूत्री बाहुली बनल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाशिवाय कुठल्याच प्रकरणात साधा एफआयआरदेखील नोंदवला जात नाही. त्यामुळे राज्यात उघडपणे बेकायदेशीर मद्यालये, देशी दारूची दुकाने, मटका, जुगार, ऑनलाईन जुगार, पार्लरच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय अशा गोरखधंद्यांची चलती आहे. या प्र्रत्येकाचे हप्ते स्थानिक पोलिस प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना असल्याशिवाय असे धंदे चालू शकत नाहीत. युवा पिढीला नशेच्या विळख्यातून वाचवण्यासाठी सरकारने कठोर कारवाई करण्याची गरज आहे. सध्यातरी तशी प्रामाणिक राजकीय, प्रशासकीय इच्छाशक्ती दिसत नाही. सध्या पुण्यात जे काही चालले आहे त्यावर पुणेकरांना ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ असे म्हणायची वेळ आली आहे. कालपरवापर्यंत ‘पुणे तेथे काय उणे’ असे म्हटले जायचे आज ‘पुणे तेथे उणेच… उणे’ असे म्हणावे लागत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR