सासवड : पुरंदर तालुक्यात होणार असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी शुक्रवारी (दि. २) सुरू झालेला ड्रोन सर्व्हे स्थानिक शेतक-यांनी बंद पाडला. सरकारच्या वतीने मोठा फौजफाटा मागविण्यात आला होता. तरी देखील स्थानिकांनी प्रचंड विरोध करीत हा ड्रोन सर्व्हे बंद पाडला. परंतु, सर्व्हे पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
पुरंदर तालुक्यातील एखतपूर-मुंजवडी या गावातून हा सर्व्हे सुरू करण्यात येत होता. या वेळी ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘जय जवान – जय किसान’, ‘या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय’ अशा घोषणा देण्यात आल्या. जमिनीची मोजणी करण्यासाठी शासनाने ड्रोन सर्व्हेचा निर्णय घेतला होता. यानंतर येथील ग्रामस्थांनी या ड्रोन सर्व्हेला विरोध केला होता, तरीही प्रचंड फौजफाट्यासह सर्व्हे सुरू करण्यात आला होता.
पुरंदर तालुक्यामध्ये मागील आठ वर्षांपासून या आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रक्रिया सुरू आहे. मागील पाच वर्षांत हे विमानतळ दुस-या जागेवर नेण्यात येणार, असे सांगण्यात येत होते. मात्र, मागील चार महिन्यांपासून या विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला आता वेग आला आहे. जुन्याच म्हणजे पारगाव मेमाणे, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, वनपुरी, खानवडी, कुंभारवळण या गावांमध्ये हे विमानतळ होणार आहे. या भागातील लोकांकडून विमानतळाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.
पोलिस आणि विमानतळ बाधित शेतकरी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला. शेतक-यांनी या ड्रोन सर्व्हेला तीव्र विरोध केला. स्थानिक लोकांचा पुरंदर विमानतळासाठी तीव्र विरोध असताना देखील सरकार या विमानतळनिर्मितीवर ठाम आहे. मागील महिनाभरात स्थानिक लोकांनी दोन आंदोलने केली होती. मात्र, सरकारकडून कोणताही प्रतिसाद या शेतक-यांना मिळाला नाही. त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.