पुणे : विधानसभेचे बिगुल वाजले असले तरी पण राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीत जागवाटपाचा पेच अद्याप कायम असल्याचे समजते. महायुतीचे अंतिम जागावाटप लवकरच जाहीर होणार आहे. अशातच आता पुण्यामध्ये मोठी फ्लेक्सबाजी पाहायला मिळत आहे, भाजपचे हेमंत रासने यांच्या समर्थकांनी फ्लेक्सबाजी केल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.
कसबामध्ये भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे आणि हेमंत रासने हे दोघेही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. या दोघांत कोणाला उमेदवारी मिळणार यावरूनही जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आज आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी कसबा विधानसभा मतदारसंघात फ्लेक्सबाजी पाहायला मिळत आहे. ‘‘काम करत होतो, काम करतोय, काम करत राहणार’’ असे म्हणत थेट विद्यमान आमदार यांच्यावर नाव न घेता बॅनरमधून टीका केली आहे.
बहुचर्चित कसबा विधानसभामध्ये हेमंत रासने, धीरज घाटे आणि कुणाल टिळक यांच्यातून एक नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. केंद्र, प्रदेश, शहर आणि विधानसभा स्तरावरील पदाधिका-यांकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील आपल्या पसंतीच्या तीन उमेदवारांना मते देण्यात आली.
कसबा विधानसभा मतदारसंघात ८० टक्के मते ही हेमंत रासने यांना मिळाली असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. वरिष्ठांकडे पाठवण्यात आलेली नावं, पक्षाच्या पातळीवर करण्यात आलेले सर्वेक्षण, इलेक्टिव्ह मेरिटवर तिकिट जाहीर होणार असल्यामुळे आता भाजप कसबासाठी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.