पुणे : पुण्यातल्या कोथरूड भागात दिवसेंदिवस हाणामारीच्या घटनांत वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारल्यानंतर कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. दरम्यान आज काही वेळापूर्वी सुद्धा गाडी आडवी घातल्याच्या कारणास्तव एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हीडीओ समोर आला आहे. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय लोणकर असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर मारहाण केल्याबद्दल सचिन मिसाळ आणि त्याच्या साथीदारांवर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूडमधील एम. आय. टी. कॉलेजच्या समोर गाडी आडवी आणल्याच्या कारणावरून ही भांडणं झाली होती. पोलिसांनी सचिन मिसाळला अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.
पुण्यातील गुन्हेगारी वरचेवर वाढत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्यानंतर केला होता. त्यानुसार कुख्यात गुंड गजा मारणेवर मोक्का अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. तर आज घडलेल्या या घटनेबाबत पोलिस काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.