16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात भाजपचे नेते आपापसात भिडले

पुण्यात भाजपचे नेते आपापसात भिडले

विधानसभेच्या तिकिटावरून बैठकीमध्ये तुफान राडा

पुणे : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडीसाठी भाजपकडून राबवण्यात आलेली एमपी पॅटर्न आधारित निवडणूक प्रक्रिया चांगली चर्चेत आली आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रस्थापितांनी नव्याने निवडणूक लढू इच्छिणा-या इच्छुकांची नाकेबंदी केल्याचे चित्र समोर आले आहे. त्यासोबतच या बैठकीमध्ये इच्छुक उमेदवार आणि आमदारांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हीडीओ व्हायरल होत आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास भाजपकडून उमेदवारीसाठी विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्यासोबतच माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, दिलीप पाटील आणि दीपक नागपुरे यांचे नाव चर्चेत आहे. यापैकी एक नाव आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीसाठी निश्चित होऊ शकते मात्र तत्पूर्वी मंगळवारी झालेल्या भाजपच्या बैठकीत आमदार भीमराव तापकीर त्याचबरोबर इच्छुक नगरसेवक प्रसन्न जगताप भाजप नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्यात उमेदवारीवरून खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. भाषणाच्या मुद्यावरून इच्छुक उमेदवार आणि आमदारांत बाचाबाची झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

आमदार भीमराव तापकीर यांनी कोणालाच न बोलू देण्याचा आरोप भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी केला आहे. हा सर्व प्रकार भाजपचे केंद्रातून आलेले निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोर आला असून खडकवासला विधानसभा मतदारसंघातील दोन इच्छुकांचे गट आमने-सामने ठाकले असल्याचे पाहायला मिळाले. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भीमराव तापकीर हे तीनदा आमदार झाले आहेत. आता चौथ्यांदा देखील ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

मागील निवडणुकीत अवघ्या काही हजार मतांनी त्यांचा विजय झाला होता. यामुळे यंदा त्यांच्याबाबत मतदारसंघांमध्ये अँटिइन्कबन्सी असल्याचे इतर इच्छुक सांगत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत उमेदवार बदलावा अशी मागणी भाजपाचे काही कार्यकर्ते, पदाधिकारी करत आहेत आणि हाच वादाचा मुद्दा ठरला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR