पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि ३ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या दि. २ डिसेंबरला मतदान होणार असून दि. ३ रोजी मतमोजणी होणार आहे. यावेळच्या निवडणुकीत तीन नवीन नगरपंचायतींचा समावेश झाला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी ही माहिती पत्रकारांना सांगितली.
नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत एकूण २२२ प्रभाग असून ३९८ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये अ, ब, क गटातील नगर परिषदांचा समावेश असणार आहे. निवडणुकीच्या मतदानासाठी १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादी ग्रा धरण्यात येणार आहे तसेच दोन्ही निवडणुकांसाठी जिल्ह्यात एकूण ७३० मतदान केंद्रं असणार आहेत. नव्याने फुरसुंगी – ऊरुळी देवाची, मंचर आणि माळेगाव येथे नगरपंचायतीसाठी प्रथमच मतदान होत आहे.
नगर पंचायतीमध्ये प्रभागातून १ आणि नगर परिषदेत प्रभागनिहाय दोन अथवा तीन लोकप्रतिनिधी निवडण्यात येणार आहेत. जिल्ह्यात ६ लाख ३४ हजार ९४० मतदार असून गेल्या वेळच्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी ३ हजार मतदारांची वाढ झाली आहे तसेच मतदान केंद्रं ५४० होती त्यामध्ये ४० टक्के वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा देण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले.

