Homeधाराशिवपुरात अडकलेल्या २३९ जणांचे ‘रेस्क्यू’

पुरात अडकलेल्या २३९ जणांचे ‘रेस्क्यू’

एनडीआरएफचे भूम-परंड्यात मोठे बचावकार्य

धाराशिव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि नदीच्या पुरामुळे निर्माण झालेल्या गंभीर संकटानंतर प्रशासनाने तातडीने पुणे येथील एनडीआरएफच्या दोन तुकड्यांना (५ बटालियन) पाचारण केले होते. या तुकड्यांनी भूम आणि परंडा तालुक्यात मोठे बचावकार्य (रेस्क्यू ऑपरेशन) राबवले.

भूम तालुक्यातील जयवंतनगर येथील वस्तीला पुराच्या पाण्याने वेढा दिला असला तरी, पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने मोठी रेस्क्यू ऑपरेशनची गरज पडली नाही. मात्र, २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी देवळाली गावात गणेश तांबे (वय ३८) हा युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. या युवकाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या टीमने सलग दोन किलोमीटरपर्यंत सर्च ऑपरेशन केले. दुर्दैवाने, शोध सुरू असलेल्या भागात उसाचे मोठे फड असल्याने बोटींना सातत्याने अडथळा येत होता. यामुळे जवानांना सर्च ऑपरेशनमध्ये अडचणींचा सामना करावा लागला आणि युवकाचा अद्यापही पत्ता लागलेला नाही.

याउलट, परंडा तालुक्यात पूरपरिस्थिती अधिक गंभीर होती. नदीचे पाणी गावांमध्ये शिरल्याने येथे भयानक पूरस्थिती निर्माण झाली होती. एनडीआरएफच्या जवानांनी येथे तब्बल दोन दिवस रात्रंदिवस अथक परिश्रम घेत मोठे रेस्क्यू ऑपरेशन राबवले. यामध्ये वागेगव्हाण, कपिलापुरी, जगताप वस्ती आणि ठोंगे वस्ती या भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. वागेगव्हाण (१८०), कपिलापुरी (१२), जगताप वस्ती (२७) आणि ठोंगे वस्ती (२०) अशा एकूण २३९ नागरिकांना जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळवले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR