23.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeराष्ट्रीयपुरीत चेंगराचेंगरी, ४०० भाविक जखमी

पुरीत चेंगराचेंगरी, ४०० भाविक जखमी

एका भाविकाचा मृत्यू, अनेक जण गंभीर
भुवनेश्वर : वृत्तसंस्था
ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेदरम्यान आज चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ४०० पेक्षा जास्त भाविक जखमी झाले असून, यातील एका भाविकाचा मृत्यू झाला आहे. जखमी भाविकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही भाविक गंभीर आहेत. मात्र, ब-याच भाविकांना किरकोळ दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

दरम्यान, गंभीर भाविकांवर उपचार सुरू आहेत. या चेंगराचेंगरीत जीव गमावलेला भाविक हा ओडिशाच्या बाहेरील असल्याचे समजते. मात्र, अद्याप या भाविकाची ओळख पटलेली नाही. मात्र, काही गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आजपासूनच पुरीतील जगन्नाथ यात्रा सुरू झाली. आज भगवान जगन्नाथाचा नंदीघोष रथ ओढण्याची प्रक्रिया सुरू होताच काही भाविकांमध्ये बाचाबाची झाली. त्यातून एकच गोंधळ उडाल्याने चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ४०० भाविक खाली पडल्याने जखमी झाले. यात एकाचा श्वास गुदमरल्याने मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर जे किरकोळ जखमी झाले, त्यांच्यावर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले.

पुरीमध्ये तब्बल ५३ वर्षांनंतर दोन दिवसांची रथयात्रा होत आहे. १९७१ पासून ही रथयात्रा एक दिवसाची होत होती. यंदा ती दोन दिवसांची करण्यात आली. दरवर्षी होणा-या रथयात्रेत नेहमीच भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. यंदाही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, ऐनवेळी गोंधळ उडाल्याने यावेळी चेंगराचेंगरीमुळे या रथयात्रेला गालबोट लागले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR