पूर्णा : प्रतिनिधी
येथिल लहान मोठ्या तसेच मानाच्या गणेश मंडळांनी टाळ-मृदुंग, ढोल-ताशांच्या गजरात, सांस्कृतिक देखाव्यांच्या साक्षीने, उत्साह आणि भक्तीभावाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. शहरासह तालुक्यात शनिवारी (ता.६) रोजी ठिक ठिकाणी मोठ्या भक्तीभावाने हर्षोल्लासात ‘श्री’ विसर्जन मिरवणुकींचे आयोजन केले.पोलीस, महसूल व नगरपालिका प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे विसर्जन सोहळा शांततेत निर्विघ्नपणे पार पडला.
परभणी पोलिस प्रशासनाने डीजे-डॉल्बीऐवजी पारंपारिक वाद्यांच्या माध्यमातून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते.या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ,मागील दहा दिवसांत शहरासह तालुक्यात मोठ्या भक्तीभावाने गणेशोत्सव शांततेत पार पडला.ठिक ठिकाणी देखावे, किर्तन, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
पूर्णा शहरात आडत व्यापारी, श्रीराम गणेश मंडळ,आनंद गणेश मंडळ, एकता गणेश मंडळ,शिवनेरी गणेश मंडळ,तालुक्यातील, कलमुला, चुडावा ,गौर,कात्नेश्वर,खुजडा धनगर टाकळी आदीं ठिकाणच्या बहुतांश गणेश मंडळाच्या वतीने टाळ मृदंग, सांस्कृतिक वारसा जोपासत श्री विसर्जन सोहळा साजरा केला.
पुर्णा शहरात सायं ५ वाजण्याच्या सुमारास श्री विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला.कोळीवाडा, महादेव मंदिर, बुद्धीस्वामी मठ, महाराणा प्रताप चौक, बसवेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, किंग कॉर्नर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आदीं मुख्य मार्गांवरून विसर्जन मिरवणुका ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मंडळ सहभागी झाले होते.यावेळी महाविर गणेश मंडळ,ओम गणेश मंडळ, स्वस्तिक गणेश मंडळ,पुर्णेश्वर गणेश मंडळ, शिवाजी गणेश मंडळ, त्रिशूळ गणेश मंडळ, दत्त गणेश मंडळ आदीं मंडळांच्या वतीने आकर्षक धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक देखावे सादर करण्यात आले. यावेळी देखावे पाहण्यासाठी बालगोपाळांसह महिलांवर्गांची संख्या लक्षणीय होती.नागरिकांनी देखाव्यांचा आनंद घेत अखेर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात बाप्पाला निरोप दिला.
विसर्जन मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ .समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. यासोबतच नगरपालिका, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, वीज वितरण कंपनी, तसेच इतर विभागांकडूनही आवश्यक खबरदारी घेण्यात आली. त्यामुळे मिरवणूक सुरळीत व शांततेत पार पडली.
यावेळी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने विविध गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा तसेच प्रशासनातील अधिकारी कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला.सुमारे पाच ते सहा तासानंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा सोहळा शांततेत संपन्न झाला.
चुडावा तसेच ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये शनिवारी गणरायाला पारंपरिक पद्धतीने निरोप देण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.भजन ,किर्तन करत टाळ ,मृदंग जयघोषात शांततेत श्री विसर्जन मिरवणूक काढण्यात आल्या.चुडावा सपोनि सुशांत किनगे,ताडकळस ठाणेदार गजानन मोरे यांनी यावेळी चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता.
ताडकळस गावात १२ व्या दिवशी श्री विसर्जन मिरवणूक
ताडकळस गावात हटकर गल्लीतील गणेश मंडळ वगळता १२ दिवसांच्या गणपतीची पंपपरा मागील अनेक वर्षांपासूनची सुरू आहे.ताडकळस येथे आज रविवारी (ता. ७) रोजी श्री विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे सकाळपासून मिरवणूक काढण्यात काही मंडळांनी सुरवात केली तर काही मंडळ दुपार नंतर मिरवणूक काढणार असल्याची माहिती आहे.ताडकळस पासून जवळच असलेल्या धानोरा काळे येथिल गोदापात्रात हा विसर्जन सोहळा पार पडणार असल्याची माहिती ठाणेदार गजानन मोरे यांनी दिली आहे.