मुंबई : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत चौकशीसाठी नियुक्त समितीचा अहवाल पंधरा दिवसांत प्राप्त होणार आहे. अहवालानुसार संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी विधान परिषदेत सांगितले.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत चौकशीसाठी नियुक्त समितीचा अहवाल पंधरा दिवसांत प्राप्त होणार आहे. अहवालानुसार संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी विधान परिषदेत सांगितले.
विधान परिषद सभागृहात इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत सदस्य सुनील शिंदे यांनी लक्षवेधी मांडली होती. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, उमा खापरे, अशोक ऊर्फ भाई जगताप, चित्रा वाघ, डॉ. परिणय फुके, सदाशिव खोत आदींनी चर्चेत भाग घेतला होता.
मंत्री शिवेंद्रसिंह भोसले म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तीस-पस्तीस वर्षांपूर्वी सदर लोखंडी पूल उभारण्यात आला होता. लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असल्याची घटना १५ जून २०२५ रोजी घडली होती. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य समिती नियुक्त केली आहे. मंत्री शिवेंद्रसिंह भोसले म्हणाले की, नवा पूल उभारण्यासाठी आठ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु, सदर पूल उभारताना त्यासोबत पदपथ असावे, अशी मागणी आल्याने आराखड्यामध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानंतर नवीन पुलाचे काम सुरू करण्याचे कार्यादेश देण्यात आले आहेत.