दुबई : वृत्तसंस्था
फ्रान्सने पॅलेस्टाइनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याचे संकेत दिले. यामागे सौदीची रणनिती आहे. फ्रान्सने नेतन्याहू आणि अमेरिकेच्या विरोधाकडे दुर्लक्ष करुन पॅलेस्टाइनला वेगळा देश म्हणून मान्यता देण्याचे संकेत दिले. सौदी अरेबियाच्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
पॅलेस्टाइन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष हुसैन अल शेख यांनी याप्रकरणी सौदीचे आभार मानले. अल शेख म्हणाले की, सौदीनेच जगाला दोन राष्ट्रांचा फॉर्म्युला सुचवला. त्यामुळेच पॅलेस्टाइनला फ्रान्सने मान्यता दिली. पॅलेस्टाइनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्यासाठी सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्सने राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रो यांच्यासोबत चर्चा केली. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींना डिटेलमध्ये समजावले की, पॅलेस्टाइनला मान्यता दिल्यास कसे युद्ध थांबू शकते.
क्राऊन प्रिन्सने यासाठी जून २०२५ मध्ये अभियान चालवले. सौदी अरेबियाचे म्हणणे आहे की, १९६७ च्या सीमांवरच हा विवाद संपू शकतो. यात पूर्व जेरुसलेमला पॅलेस्टाइनची राजधानी म्हणून मान्यता दिली पाहिजे. पूर्व जेरुसलेम इस्रायलच्या ताब्यात आहे. दोन राष्ट्राच्या सिद्धांतावरुन आयोजित होणा-या शिखर सम्मेलनाचा सौदी प्रमुख आहे. याच महिन्याच्या अखेरीस अमेरिकेत न्यू यॉर्क येथे या संदर्भात बैठक होणार आहे. आपला प्रस्ताव ब्रिटन सारख्या देशाच्या गळी उतरवणे हा सौदी अरेबियाचा प्रयत्न असेल.
पॅलेस्टाइनला थेट फायदा काय?
फ्रान्सने पॅलेस्टाइनला मान्यता देणे हा थेट इस्रायलसाठी मोठा झटका आहे. याची दोन मुख्य कारणे आहेत. पॅलेस्टाइन एक स्वतंत्र देश बनेल. त्यांच्याकडे स्वत:च सैन्य असेल. आतापर्यंत पॅलेस्टाइनकडे अधिकृतपणे सैन्य बाळगण्याचा अधिकार नाही. हमास पॅलेस्टाइनची प्रॉक्सी संघटना आहे. जगातील अनेक देश हमासला दहशतवादी संघटना मानतात.